नांदेड,(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील उमरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑनर किलिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मुलीने पती नसलेल्या युवकासोबत संबंध ठेवले, हे समजल्यावर संतप्त झालेल्या वडिलांनी तिचा व तिच्या प्रियकराचा निर्घृण खून केला. त्यानंतर स्वतः पोलिसांकडे जाऊन गुन्ह्याची कबुली दिली.
प्राप्त माहितीनुसार, संजीवनी कमळे ऊर्फ सुरवणे (वय 19, मूळ राहणार बोरजुनी) हिचे एक वर्षापूर्वी गोळेगाव येथील सुधाकर कमळे याच्याशी लग्न झाले होते. मात्र लग्नाआधीपासूनच तिचे लखन बालाजी भंडारे (वय 19) या युवकासोबत प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही त्या दोघांमध्ये संपर्क सुरु होता.
२४ ऑगस्ट रोजी संजीवनीच्या सासरच्यांनी काही वेळासाठी घर सोडले होते, ही संधी साधून तिने प्रियकराला घरी बोलावले. दुर्दैवाने, सासरचे लोक अचानक घरी परतले आणि त्यांनी संजीवनी व लखन यांना एकत्र पाहिले. त्यामुळे संतप्त सासरच्यांनी संजीवनीचे वडील मारुती सुरवणे यांना फोन करून बोलावले.
मारुती सुरणे हे आपल्या बंधू माधव सुरणे व वडील लक्ष्मण सुरणे यांच्यासोबत गोळेगाव येथे पोहोचले. सासरच्यांनी दोघांना त्यांच्या स्वाधीन केल्यानंतर हे तिघे संजीवनी व लखन यांना घेऊन बोरजुनीकडे निघाले.
दरम्यान, पांडुरंग रस्त्यावरील करकाळा शिवारात पोहोचल्यावर संजीवनीच्या वडिलांनी तिला आणि लखन यांना मारहाण केली आणि दोघांना बांधून जवळपास ३० ते ४० फूट खोल असलेल्या विहिरीत ढकलून दिले. या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर सोमवारी सायंकाळी सुमारे पाच वाजता मारुती सुरणे स्वतः उमरी पोलीस ठाण्यात गेले आणि आपल्या मुलीचा व तिच्या प्रियकराचा खून केल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांना धक्काच बसला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने आणि त्यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी विहिरीतून दोघांचे मृतदेह बाहेर काढले.
सध्या संजीवनीचे वडील मारुती सुरणे, काका माधव सुरणे आणि आजोबा लक्ष्मण सुरणे हे तिघेही पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, समाजात अजूनही ऑनर किलिंगसारख्या क्रूर प्रवृत्ती कशा टिकून आहेत, यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे. एकीकडे दोन तरुण जीव गमावले गेले आहेत, दुसरीकडे तीन जण तुरुंगात जाणार आहेत, आणि दोन्ही कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे.
संबंधित व्हिडिओ….
