हनुमान अंतरिक्षात गेले असे सांगून? — विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या नेत्यांचा असंवेदनशील खेळ

श्रद्धा विरुद्ध शास्त्र: राजकारणासाठी शिक्षणाचं बलिदान?   

भारतीय जनता पक्षाचे नेते आपली मुले विदेशात शिक्षणासाठी पाठवतात, तिथेच त्यांची नोकरीही लागते. परंतु हेच नेते भारतातील विद्यार्थ्यांना शिक्षण देताना अशा प्रकारचे ज्ञान देतात, ज्याचा वैज्ञानिक आधार कुठेच आढळत नाही. श्रद्धेला ज्ञान मानणाऱ्या या ‘अजब’ नेत्यांबाबत काय बोलावे, तेवढेच कमी आहे.भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीतील एक नाव, खासदार अनुराग ठाकूर, यांनी अलीकडेच उना येथे शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की “पहिले अंतरिक्ष यात्री म्हणजे महाबली श्री हनुमानजी  होते.”भारतीय समाजामध्ये श्री हनुमानजींविषयी श्रद्धा प्रचंड आहे, याबाबत शंका नाही. परंतु त्यांना ‘पहिले अंतरिक्ष यात्री’ म्हणणे, आजच्या वैज्ञानिक युगात कितपत योग्य आहे?

अनुराग ठाकूर हे पूर्वी केंद्र सरकारमध्ये वित्त राज्यमंत्री होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी विचारले, “तुम्हाला माहिती आहे का, पहिला अंतरिक्ष यात्री कोण होता?” विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं, “नील आर्मस्ट्राँग.” मात्र त्यावेळी त्यांना विद्यार्थ्यांची चूक दुरुस्त करत, “पहिला अंतरिक्ष यात्री युरी गागरीन होता,” असं सांगायला हवं होतं.पण बहुदा युरी गागारीन हे नाव अनुराग ठाकूर यांनाच माहित नसेल. युरी गागारीन हे 1961 मध्ये अंतराळात गेलेले पहिले मानव होते, आणि ते रशियाचे रहिवासी होते. पण याऐवजी ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की ‘पहिला अंतरिक्ष यात्री पवनपुत्र श्री हनुमानजी  होते.’ एवढ्यावरच न थांबता, त्यांनी शिक्षक आणि मुख्याध्यापकांना सांगितले की, “फक्त पुस्तकांवर अवलंबून राहू नका. आमच्या धार्मिक ग्रंथांवर आधारित शिक्षण द्या.”

एकीकडे आपण आपल्या मुलांना आधुनिक विज्ञान शिकवण्यासाठी परदेशात पाठवतो, आणि दुसरीकडे भारतातल्या विद्यार्थ्यांना आपण ‘पहिले अंतरिक्ष यात्री श्री हनुमानजी  होते’ असं शिकवतो, हे दुटप्पी धोरण नाही का?ठाकूर यांचा मुलगा सध्या परदेशातील नामवंत शाळेत शिक्षण घेत आहे. विचार करा, त्या विद्यार्थ्यांपैकी कोणी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर गेला आणि “पहिला अंतरिक्ष यात्री म्हणजे महाबली श्री हनुमानजी” असं म्हटलं, तर त्याची काय गोची होईल? देशाची प्रतिमा किती खराब होईल?ठाकूर यांनी हे वक्तव्य केवळ भाषणातच नव्हे, तर आपल्या ट्विटर हँडलवर सुद्धा प्रसारित केले, म्हणजेच त्यांना वाटले की यावर भारतीय जनता चर्चा करेल. मग जर टीका झाली, तर लगेच “हिंदूंच्या श्रद्धांवर हल्ला झाला” अशी ओरड केली जाते.

अनुराग ठाकूर यांचेच नव्हे, तर इतर भाजप नेत्यांचेही मुले परदेशातच शिकतात. खासदार निशिकांत दुबे यांचा मुलगाही विदेशात शिकलेला आहे, अजय आलोक यांचे दोन मुलं अमेरिकेत जन्मले आणि तिथेच त्यांना नागरिकत्व मिळाले. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे पुत्रही परदेशातच आहेत. म्हणजेच बहुतेक भाजप नेत्यांची मुले परदेशात शिक्षण घेत आहेत, आणि भारतात मात्र ‘धार्मिक शिक्षण’ देण्याची मोहीम राबवली जात आहे.हीच मानसिकता आहे जी निवडणुकीत घोषवाक्यांमध्ये दिसते.  उदाहरणार्थ, “देश के गद्दारों को, गोली मारो —- को!” हे वाक्य अनुराग ठाकूर यांनीच निवडणूक सभेत म्हटले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा तिथे होता का?या प्रकारच्या वक्तव्यांमुळे समाजात तणाव निर्माण होतो. पण त्या तणावाचा फटका सामान्य नागरिकांच्या मुलांनाच बसतो. नेत्यांची मुले त्या परिस्थितीत कधीच नसतात.

नरेंद्र मोदी यांनीही अशाच प्रकारचे वक्तव्य केलं होतं की, “जगातली पहिली प्लास्टिक सर्जरी भगवान श्री गणेशांवर झाली होती.” भारतीय प्राचीन ग्रंथांत वैज्ञानिक माहिती आहे, हे खरं असलं तरी, त्याचा वापर राजकारणासाठी केला गेला, हेही तितकंच खरं आहे.सुश्रुतसंहिता, ही शल्यचिकित्सेवरील एक प्राचीन ग्रंथ आहे, ज्यात 600 ईसापूर्वी सर्जरीची माहिती दिली आहे. गालाची त्वचा नाकावर लावण्याची सर्जरी, 300 प्रकारची ऑपरेशन्स, 120 हत्यारे, ऑपरेशनपूर्वी आणि नंतर काळजी कशी घ्यावी याबाबतची माहिती यात सापडते.

आम्ही आमच्या धार्मिक श्रद्धेवर प्रेम करतो, देवांची पूजा करतो, परंतु त्याचा अर्थ असा नाही की आमचं सामान्य ज्ञान हरवतं. परीक्षेत जर ‘पहिला अंतरिक्ष यात्री कोण?’ असा प्रश्न आला, तर उत्तर “पवनपुत्र श्री हनुमान” दिल्यास त्याला शून्य गुणच मिळतील.अनुराग ठाकूर आणि इतर नेत्यांनी जर खरोखरच धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रयत्न केला असता, तर त्यांच्या वक्तव्यांचा उपयोग झाला असता. पण ते केवळ राजकारणासाठीच असे विधान करत आहेत, आणि त्याचा परिणाम आपल्या मुलांच्या शिक्षणावर होतो आहे.

शेवटी एकच म्हणावेसे वाटते, श्रद्धा आणि शास्त्र या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. दोघांनाही सन्मान असायलाच हवा, पण त्यांचं स्थान एकमेकांच्या जागी बदलणं, हे देशाच्या आणि पुढच्या पिढीच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!