सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाचा तपास गतीमान; एसआयटी परभणीत दाखल

परभणी,(प्रतिनिधी)- सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर औरंगाबाद खंडपीठाने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानंतर दिनांक १८ ऑगस्ट रोजी एसआयटीची अधिकृत स्थापना करण्यात आली. काल, रविवारी (२४ ऑगस्ट) एसआयटीचे अधिकारी परभणीमध्ये दाखल झाल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. यामुळे सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास आता गती घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

डिसेंबर २०२४ मध्ये शहरात एका विटंबना प्रकरणानंतर काही भागांत जाळपोळ व दगडफेक झाली होती. या पार्श्वभूमीवर पोलीसांनी लाठीचार्ज केला. मात्र, प्रत्यक्षात तो लाठीचार्ज नसून नियोजितपणे करण्यात आलेली मारहाण असल्याचे अनेक व्हिडिओ फुटेजमधून समोर आले आहे. हे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते.

या घटनेनंतर नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र प्राथमिक तक्रारीत ‘बळाचा वापर’ असा उल्लेख नव्हता. पुढे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अहवालानुसार, मारहाणीमुळे झालेल्या जखमांमुळे त्यांना शॉक लागला आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.असा अहवाल वैद्यकीय सूत्रांनी दिला आहे.

या घटनेनंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाने संबंधित पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास सीआयडीमार्फत स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीकडे सोपविण्यात आला आहे.

एसआयटीच्या अध्यक्षपदी गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य (पुणे) येथील विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत नागपूर गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक अभिजीत धाराशिवकर आणि नांदेड गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपाधीक्षक अनिल गव्हाणकर यांचा समावेश आहे.एसआयटीला मदत करण्यासाठी पोलीस महासंचालकांनी इतर जिल्ह्यांतील अधिकारी व कर्मचारी नियुक्त करावेत, परंतु या तपासात परभणी जिल्ह्यातील कोणतेही पोलीस अधिकारी अथवा अंमलदार सहभागी नसतील, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.

एसआयटीच्या आगमनामुळे सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास आता जलद गतीने पार पडेल. या प्रकरणातील खरे दोषी कोण आहेत, हे उघडकीस येईल अशी अपेक्षा असून, सूर्यवंशी यांना तसेच प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या पोलिसांनाही न्याय मिळेल, अशी आशा नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

संबंधित बातमी …. 

सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरण; एसआयटीचे अध्यक्ष आयपीएस सुधीर हिरेमठ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!