नांदेड(प्रतिनिधी)-पाहिजे असलेल्या यादीतील आरोपीला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांनी काल रात्री गोळीबार केला. परंतू गोळीबार झाल्यानंतर सुध्दा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. या आरोपीने गाडी पळवितांना पोलीस अंमलदाराला गाडीने धक्का देवून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि इतर दुचाकी गाड्यांना सुध्दा खाली पाडल्याच्या संदर्भाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार काल दि.23 ऑगस्टच्या रात्री गुन्ह्यामध्ये पाहिजे असलेला आरोपी सुरजसिंघ उर्फ सुरेंद्रसिंघ जगतसिंघ गाडीवाले हा कौठा परिसरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विठ्ठल घोगरे पाटील यांना मिळाली. त्यांनी पाहिजे असलेला आरोपी सुरजसिंघचा शोध घेतला असता सुरजसिंघची गाडी आणि पोलीसांची गाडी समोर-समोर आली. सुरजसिंघ एका काळ्या रंगाच्या महागड्या गाडीमध्ये होता. पोलीस पथकातील पोलीस अंमलदार यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने सुरजसिंघने त्याची गाडी बोधगिरे यांच्या अंगावर टाकली आणि ते खाली पडले. त्यावेळी रस्त्यावर असलेल्या अनेक दुचाकी गाड्यांना सुरजसिंघने धडक दिली. यावेळी विठ्ठल घोगरे पाटील यांनी सुरजसिंघ बसलेल्या गाडीच्या टायरवर गोळी चालवली. त्यामुळे टायर फाटले. परंतू तशाच परिस्थितीत ती गाडी पळवून नेत सुरजसिंघने ती गाडी असर्जनजवळ एका शेतात सोडून पळ काढला. सहाय्यक पोलीस निरक्षिक विठ्ठल घोगरे यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरजसिंघ गाडीवाले विरुध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम 109, 49, 132, 121(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक कांबळे हे करीत आहेत.
गाडी टायरवर फायरींग तरी आरोपी फरार
