नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांचे प्रचंड नुकसान झाले आहे . महापुरात सामान्य नागरिक मरत असताना नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि नांदेडचे नेते लंडनमध्ये मजा करत होते. त्यामुळे या सरकारला संवेदना उरल्या नाहीत अशा कठोर शब्दात शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर प्रहार चढवला.
आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी आणि पूरग्रस्तांची हितगुज साधण्यासाठी शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आज अतिवृष्टीग्रस्त भागात आले होते . यावेळी त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. नागरिकांशी संवाद साधला . सरकारने आपल्या माणुसकीच्या संवेदना जागा करून पूरग्रस्तांना तातडीची मदत करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या . यावेळी माध्यमांशी बोलताना दानवे यांनी महायुती सरकारवर प्रहार चढवला . मुख्यमंत्री या भागात येऊन परिस्थिती बघण्याला तयार नाहीत. पालकमंत्री लंडनमध्ये व्यस्त आहेत. नांदेडचे तारणहार म्हणून मिरवणारे नेते लंडनमध्ये आनंदात आहेत . जनता मृत्यूच्या दाढेत आहे . अशा परिस्थितीत या नेत्यांना गौतमी पाटीलचा डान्स बघण्याची इच्छा होते याचा अर्थ हे सरकार आणि या सरकारमधील नेते असंवेदनशील आहेत.पुरात पाच व्यक्तींच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता तिडके यांच्यावर सदोष मनुष्यबदाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे.पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जे शेड उभारण्यात आले आहेत. त्या शेडमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सत्ताधारी आमदार करत आहेत. हा त्यांना घरचा आहेर आहे . दरम्यान यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बबन बारसे यांनी संपर्कप्रमुख बबन थोरात यांच्या मार्गदर्शनात आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात पुरग्रस्तांना संसार उपयोगी साहित्य वाटप केले. दैनंदिन जीवनासाठी ज्या ज्या वस्तूंची आवश्यकता असते त्या सर्व वस्तू बारसे यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने शिवसेना ही सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी काम करणारा पक्ष असल्याच्या भावना यावेळी उमटल्या आहेत .
स्थानिक आमदार झोपा काढत होते काय ?
माध्यमांशी बोलतानो विरोधी पक्षनेते दानवे यांनी मुखेड विधानसभा मतदारसंघाचे आ. तुषार राठोड यांच्यावर प्रचंड रोष व्यक्त केला. कोणतेही कारण नसताना लेंडी धरणाची अनाधिकृतपणे घळ भरणी करण्यात आली . ही घळभरणी करण्यासाठी स्थानिक आमदार आणि अधिकारी जबाबदार आहेत. परिणामी पुराचे पाणी घरात शिरून पाच नागरिकांचा मृत्यू झाला. असंख्य पशु वाहून गेले. तरीही या भागातील आमदार नागरिकांचे अश्रू पुसण्यासाठी येत नाहीत. ते 48 तासाने अवतरतात याचा अर्थ ते इतका वेळ झोपा काढत होते काय ? असा संतप्त सवाल आहे त्यांनी उपस्थित केला आहे.
राज्य सरकार असंवेदनशील; विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा आरोप
