सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरण; एसआयटीचे अध्यक्ष आयपीएस सुधीर हिरेमठ

नांदेड(प्रतिनिधी)-परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी तिन सदसीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केली आहे. या एसआयटीचे अध्यक्ष पद 2007 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी सुधीर हिरेमठ यांच्याकडे देण्यात आले आहे.
डिसेंबर महिन्यात सोमनाथ सुर्यवंशी यांचा परभणी येथील लाठीचार्जच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. या संदर्भाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. तेच आदेश सर्वोच्च न्यायालयात कायम राहिले. त्यानंतर उच्च न्यायालयाने या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची सुचना केली होती.
त्यानुसार पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी काही दिवसांपुर्वीच केंद्रीय तपास पथक (सीबीआय) कडून महाराष्ट्र राज्यात आलेले विशेष पोलीस महानिरिक्षक सुधिर हिरेमठ यांच्या अध्यक्षतेत ही एसआयटी स्थापन केलेली आहे. सुधीर हिरेमठ हे सध्या विशेष पोलीस महानिरिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्यासोबत सदस्य म्हणून नागपूर येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधिक्षक अभिजित धाराशिवकर आणि गुन्हे अन्वेषण विभाग नांदेड येथील पोलीस उपअधिक्षक अनिल गवाणकर यांना सदस्य करण्यात आले आहे.
पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार एसआयटीचे अध्यक्ष सुधीर हिरेमठ हे आवश्यकतेनुसार इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करू शकतील. परंतू या नियुक्तीमध्ये परभणी जिल्ह्यातील कोणताही पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी यांची नियुक्ती करू नये याची दक्षता घेण्यास सांगितले आहे. या विशेष तपास पथकाचे अध्यक्ष हे अपर पोलीस महासंचालक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनात काम करतील.
2007 च्या आयपीएस बॅचचे पोलीस अधिकारी सुधीर हिरेमठ 2023 मध्ये सीबीआय येथे गेले होते. ते आता नुकतेच परत आले आहेत. कृषी शास्त्रज्ञ होताहोता आयपीएस झालेले सुधीर हिरेमठ यांची ख्याती उत्तम अधिकारी म्हणून आहे. म्हणूनच परभणीच्या प्रकरणातील खऱ्या दोषी अधिकाऱ्याला सुधीर हिरेमठ शोधतील अशी अपेक्षा आहे. या एसआयटीमधील पोलीस अधिक्षक अभिजित धाराशिवकर हे नांदेड शहर पोलीस उपविभागात पोलीस उपअधिक्षक होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!