नांदेड – जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस व अतिवृष्टी झाल्याने काही गावात पूरस्थिती निर्माण झाली होती. या ठिकाणी मदत व बचाव करण्यासाठी नांदेड येथे मागील दोन महिन्यांपासून तैनात असलेली राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची तुकडी जिल्हाप्रशासनाने तातडीने पाठविली. बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकडीचे कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले.

मुखेड तालुक्यातील 17 व 18 ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणावर पाऊस व अनेक मंडळात अतिवृष्टी झाली होती. दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी मंडळात ३५४.७५ मिमी व मुक्रामाबाद मंडळात २०६.७५ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे हसनाळ, रावणगाव, भासवाडी व भिंगोली या गावात पूरस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ अडकून पडले होते.
दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ०२:३० वाजता हसनाळ व रावणगावमध्ये गावात पावसाचे पाणी घुसले असल्याबाबत ग्रामस्थांनी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास कळविले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी पूरपरिस्थिती असलेल्या गावांमध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची टीम पाठविली. पहाटे ०३ वाजता राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची टीम नांदेडहून निघून सकाळी पाच वाजता घटनास्थळी पोचली. पहाटे पाच वाजल्यापासूनच या तुकडीने बचाव कार्यास सुरूवात केली. या तुकडीने रावणगाव येथील २७१, हसनाळ येथील ३०, भासवाडी येथील ४० व भिंगोली येथील ४५ असे एकूण ३८६ लोकांना बोटीच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी हलविले. त्यामुळे आणखी मोठी हानी टाळणे शक्य झाले. तसेच या तुकडीला हसनाळमध्ये पुराच्या पाण्यामधून तीन महिलांचे मृतदेह काढण्यात यश आले. या तुकडीमुळे आपत्तीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनास मोठी मदत झाली. आज गुरुवार 21 ऑगस्ट रोजी दुपारी जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी ही तुकडी तैनात असलेल्या जिल्हा क्रीडा संकुल येथे जाऊन तुकडीतील सर्व अधिकारी व जवान यांच्याशी संवाद साधला. तसेच या बचाव कार्यात जखमी झालेल्या ८ जवानांची विचारपूस केली. या प्रसंगी बोलताना “अशा प्रकारे जीवावर उदार होऊन कमीत कमी वेळात एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचे प्राण वाचविण्याचे अतुलनीय आपल्या तुकडीने केले असून आपल्या कामाचे कौतुक शब्दात व्यक्त करणे शक्य नाही” असे उद्गार जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी काढले व केलेल्या कामाबद्दल त्यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकडीचे आभार मानले.

याप्रसंगी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस उपनिरीक्षक शंकर उकंडे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर शिरसाट, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभारे, जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राचे बारकुजी मोरे, कोमल नागरगोजे हे उपस्थित होते.
