पोळा – कृतज्ञतेचा आगळावेगळा उत्सव

भारतीय संस्कृतीत प्रत्येक धर्माने, प्रत्येक परंपरेने एक गोष्ट नेहमी शिकवली आहे

“ज्यांनी आपल्यासाठी काही केले, त्यांचे आभार मानणे हे आपले कर्तव्य आहे.”

आपण देवाचे आभार मानतो, प्रार्थना करतो. पण खऱ्या आयुष्यात ज्यांनी आपल्या कष्टाचे ओझे उचलले, शेताला समृद्ध केले, आपल्या घराला अन्नधान्य दिले त्या मूक जीवांचे ऋण मान्य करण्यासाठी महाराष्ट्राने दिलेला अद्वितीय सण म्हणजे – पोळा!

 

हा सण कुठल्याही जाती-धर्मापुरता मर्यादित नाही.

हा सण आहे शेतकऱ्याचा सखा – बैल यांच्या कष्टांचा सन्मान करणारा.

संपूर्ण वर्षभर उन्हातान्हात राबणाऱ्या, शेत फुलवणाऱ्या या जीवांबद्दल आदर, कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पोळा.

 

आज जरी सर्वांच्या घरी शेती नसली, बैल नसले तरीही मातीच्या बैलाची पूजा करून लोक हा सण साजरा करतात. प्रत्येक घराघरांतून पुरणपोळीचा सुगंध दरवळतो, आनंदाचे वातावरण पसरते.

 

नांदेडची आगळीवेगळी परंपरा

 

नांदेड शहराचे नाव घेतले तर येथील ऐतिहासिक संचखड गुरुद्वारा येथील पोळा विशेष आकर्षण ठरतो.

गुरुद्वारा मालकीच्या शेतातील बैलांना सजवून प्रथम ते गुरुद्वाऱ्याच्या गेट क्रमांक एक येथे आणले जातात.

सुरुवात गुरुद्वाऱ्याच्या बैलांपासून होते, मग प्रतिष्ठित शिख समाजाचे बैल, त्यानंतर आजूबाजूच्या इतर धर्मीय बांधवांचे बैल मिरवणुकीत सामील होतात.

ढोल-ताशा, बॅण्ड, भजन-कीर्तन यांच्या गजरात एक वेगळीच भक्तीमय आणि भावनिक मिरवणूक निघते.

 

प्रथम गुरुद्वाऱ्याची प्रदक्षिणा होते, नंतर हनुमान पेठ व वजीराबाद हनुमान मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करून ही मिरवणूक परत गुरुद्वाऱ्यात येते. शेवटी परंपरेनुसार विधी पूर्ण करून बैलांना पुन्हा गुरुद्वाऱ्याच्या शेतात नेले जाते.

 

हा सोहळा पाहणाऱ्याला हे जाणवते

“धर्म वेगळे असले तरी कृतज्ञता आणि मानवीपणाची भावना सर्वांना जोडते.”

 

पोळ्याचा खरा संदेश

पोळा आपल्याला शिकवतो की फक्त मनुष्याप्रती नव्हे तर मूक जनावरांप्रती, निसर्गाप्रतीही आपल्यात कृतज्ञतेची भावना असली पाहिजे.

हा सण आपल्याला साधेपणा, आपुलकी आणि माणुसकीची आठवण करून देतो.

या कृतज्ञतेच्या सणानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

“ज्यांच्या कष्टावर आपले जीवन फुलते, त्यांचे आभार मानणे हेच खरे धर्माचे पालन आहे.”

– राजेंद्र सिंघ नौनिहाल सिंघ शाहू

इलेक्ट्रिकल ट्रेनर, नांदेड

📞 7700063999

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!