पोलीस भरती प्रक्रियेत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना सुध्दा एक संधी ; 15 हजार 631 पदांची पोलीस भरती

नांदेड(प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई, कारागृह विभागातील कारागृह शिपाई, वाद्यवृंद पोलीस, चालक पोलीस शिपाई आणि शस्त्र पोलीस शिपाई अशा एकूण 15 हजार 631 पदांची भरती करण्यासाठी मंजुरी दिली आहे. या आदेशावर गृहविभागाचे उपसचिव रविंद्र पाटील यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.
राज्यातील वेगवेगळ्या पोलीस पदांच्या भरतीसाठी मंत्री मंडळाने 12 ऑगस्ट रोजीच्या बैठकीत ही रिक्त पदे भरण्यासाठी मंजुरी दिली आहे. 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालखंडात तसेच 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत रिक्त होणाऱ्या पोलीस पदांसाठी 15 हजार 631 पदे भरण्यास मान्यता दिली आहे.
या 15 हजार 631 पदांमध्ये 12 हजार 399 पोलीस शिपाई, 234 चालक पोलीस शिपाई, 25 वादवृंदातील पोलीस, 2 हजार 393 शस्त्र पोलीस शिपाई आणि 580 कारागृह शिपाई अशा पदांचा समावेश आहे. या सर्व पदांच्या भरतीसाठी राज्यातील ज्या-ज्या पोलीस घटकामध्ये जेवढी पदे रिक्त आहेत. त्यानुसार पोलीस शिपाई भरती सन 2024-25 ची भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. या परिक्षेमध्ये सन 2022 आणि 2023 मध्ये पदाला विहित असलेली वयाची कमाल मर्यादा ओलांडली असेल तरी त्या उमेदवारांना 1 वेळची विशेष बाब म्हणून या भरती प्रक्रियेत संधी दिली जाणार आहे. या पोलीस शिपाई भरतीमध्ये खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 450 रुपये व मागासप्रवर्गातील उमेदवारांकरीता 350 इतके परिक्षा शुल्क असेल. प्रत्येक पोलीस घटकाचे प्रमुख त्या घटकात रिक्त असलेल्या पदांप्रमाणे त्या संदर्भाच्या जाहीरातील प्रसिध्द करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!