नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीसांनी व्हाईट कॉलर म्हणून जगणाऱ्या एका समाजसेवकाचे सत्य शोधून काढले आणि चोरीच्या पाच वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये त्याला अटक करण्यात आली. आज शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याच्या संदर्भाने या समाजसेवकाला पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे यांनी या तथाकथीत समाजसेवकाला अटक केलेली आहे आणि त्या तीन चोरट्यांकडून 6 लाख 20 हजार 400 रुपयांचा चोरीतील ऐवज जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे यांनी एका रात्रीच्या गस्तमध्ये चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.09बी.एक्स.1403 ही गाडी थांबवली. त्यामध्ये चालकाच्या जागेवर शेख शफी बागवान शेख मोईन बागवान(40) रा.देगलूरनाका आणि दुसरे दोन संजय पंडीत नामनुर (33) आणि सय्यद हनीफ सय्यद जाफर (24) दोघे रा.महेबुबनगर नांदेड यांना थांबवले. त्यांच्या तपासणीमध्ये या तिघांनी विमानतळ आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक-एक आणि भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन अशा पाच चोऱ्या केल्याची माहिती दिली. त्यातील तीन चोरी प्रकरणांमध्ये शेख शफी बागवान शेख मोईन बागवान या व्यक्तीचे नाव आहे. आपल्या दहा बोटांमध्ये दहा सोन्याच्या अंगठ्या आणि गळ्यामध्ये अर्धा किलो वजनाच्या माळा घालणारे हे व्यक्तीमत्व आहे. अनेक पोलीस अधिकाऱ्यांसोबत यांनी रक्तदान शिबिर घेवून फोटो काढलेले आहेत. पण मिलिंद सोनकांबळे यांनी याचे सत्य उघडकीस आणले.
आज शिवाजीनगर येथील पोलीस अंमलदार अनिल झांबरे, उमेश आकोसकर, गृहरक्षक दलाचे जवान अरविंद टिंगरे यांनी या तिन चोरट्यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हा क्रमांक 193/2025 मध्ये पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे यांनी 1 लाख 80 हजार रुपयंाचा चोरीचा ऐवज या चोरट्यांकडून जप्त केला आहे. न्यायालयाने आज चोरट्यांना पोलीस कोठडीत पाठविले आहे.
समाजसेवक, जुगार अड्डा चालक शफी बिल्डरसह तिन जणांना चोरीच्या गुन्ह्यात पोलीस कोठडी
