नांदेड(प्रतिनिधी)-भाजी कापण्याच्या चाकूने आपल्याच भावाचा खून करणाऱ्या छोट्या भावाला नांदेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि पाच हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
दि.10 जुलै 2018 रोजी शिवरायनगर तरोडा (खु) येथे सोबत राहणारे बंधु एकनाथ बळीराम तुपसमिंदर (38) आणि त्यांचे मोठे भाऊ सतिश एकनाथ तुपसमिंदर यांच्यामध्ये घरासमोर थुकण्याच्या कारणावरुन भांडण झाले. आणि या रागात एकनाथ तुपसमिंदरने आपल्या घरात जावून भाजी कापण्याचा चाकू आणला आणि सतिश तुपसमिंदरच्या छातीत डाव्या बाजूला बरगडी जवळ वार केला. तो खाली पडल्यानंतर एकनाथने त्याच्या डोक्यात दगड सुध्दा मारला. त्याला वाचविण्यासाठी गेलेला त्यांचा मुलगा याचे डोके सुध्दा फोडण्यात आले. जखमी अवस्थेतील सतिश तुपसमिंदरला उपचारासाठी दवाखान्यात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची तक्रार सतिशच्या पत्नी शितल तुपसमिंदर यांनी दिल्यानंतर भाग्यनगर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 324, 323, 504 प्रमाणे गुन्हा क्रमांक 233/2022 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरिक्षक रामकृष्ण पाटील यांनी केला.
या प्रकरणी रामकृष्ण पाटील यांनी एकनाथ बळीराम तुपसमिंदरविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा सत्र खटला क्रमांक 208/2022 नांदेड जिल्हा न्यायालयात चालला तेंव्हा एकूण 9 साक्षीदारांनी आपले जबाब या प्रकरणात न्यायालयासमक्ष या प्रकरणात सादर केले. उपलब्ध झालेल्या पुराव्यानुसार अतिरिक्त सत्र न्यायालयाने आपल्या भावाचा खून करणाऱ्या एकनाथ तुपसमिंदरला जन्मठेप आणि पाच हजार रुपये रोख अशी शिक्षा ठोठावली.या खटल्या सरकार पक्षाच्यावतीने ऍड. रणजित देशमुख यांनी बाजु मांडली.या खटल्यात पोलीस निरिक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष सानप आणि सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक बलसिंग कोळनुरे यांनी पैरवी अधिकाऱ्याची भुमिका पुर्ण केली.
भावाचा खून करणाऱ्या भावाला जन्मठेप
