नांदेड:- नांदेड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आसना नदीला मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुराच्या पाण्यामुळे नांदेड – मालेगाव रस्त्यावरील पासदगाव येथील पुलावरून तसेच निळा – एकदरा रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहू लागले आहे. पासदगाव येथील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे श्री तांबे पोलीस निरीक्षक भाग्यनगर पोलीस स्टेशन हे स्वतः त्या ठिकाणी हजर होते.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून या दोन्ही पुलांच्या दोन्ही बाजूंना नदीपात्राजवळ बेरिकेडिंग करून वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली आहे. तसेच कोणत्याही अप्रिय घटनेची शक्यता लक्षात घेऊन पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पूरामुळे आसना नदीकाठावरील बोंढार, नेरली, एकदरा, पासदगाव, निळा, खुरगाव या गावांमधील शेतीमध्ये पाणी शिरल्याने काही प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे.
परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन नांदेडचे तहसीलदार संजय वारकड यांनी स्वतः सर्व ठिकाणी स्थळ पाहणी केली. त्यांनी बंद असलेल्या रस्त्यांची व पिकांच्या नुकसानीची पाहणी करून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. सोबत मंडळाधिकारी श्री स्वामी, तलाठी गोपीनाथ कल्याणकर, दयानंद पाटील, स्वाती शेलगावकर , सरपंच मारुती बागल बोंढार तर्फे नेरली इत्यादी हजर होते.
पूराचे पाणी ओसरेपर्यंत कोणीही पुलावरून किंवा नदीच्या पाण्यातून वाहतूक करू नये. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहान तहसीलदार वारकड यांनी केले.
तहसीलदारांनी क्षेत्रातील महसूल, पोलीस व ग्राम प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सतत जागरूक राहून परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या.
पूरपरिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत प्रशासनाकडून नागरिकांना आवश्यक ती मदत व मार्गदर्शन केले जाणार असून नागरिकांनी कोणत्याही अडचणीसाठी स्थानिक प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे.
०००००
