मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या  हस्ते आरोग्य कर्मचाऱ्यांना गौरव पुरस्कार 

नांदेड–आयआयटी मुंबई आणि जिल्हा परिषद नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ” सुपोषित नांदेड ” कार्यक्रमांतर्गत बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या आणि कुपोषण दूर करण्याच्या उद्देशाने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरावर गौरव करण्यात आला. हा पुरस्कार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्दिष्ट

‘सुपोषित नांदेड’ कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील बालमृत्यू आणि अर्भक मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणणे, तसेच कुपोषण कमी करणे हा आहे. या कार्यक्रमा’ अंतर्गत, जिल्ह्यातील प्रत्येक प्रशिक्षिकाणे अर्भक आणि बालकाला दत्तक घेऊन त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात यावी या विषयी मेघना कावली मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात सहभागी अधिकारी, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट काम केले. त्यांनी दत्तक घेतलेल्या अर्भकांना योग्य स्तनपानाचे महत्त्व पटवून दिले आणि पालकांना मार्गदर्शन केले. यामुळे अनेक बालकांचे वजन वाढले आणि त्यांच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाली. विहित मुदतीत ही कामगिरी यशस्वी करून दाखवल्याबद्दल, या कर्मचाऱ्यांची जिल्हास्तरावर दखल घेण्यात आली.

पुरस्कार वितरण

जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात, यशस्वी कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते त्यांना गौरवपत्र प्रदान करण्यात आले. या सन्मानामुळे इतर कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळेल आणि ‘सुपोषित नांदेड’ कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली.

 

या कार्यक्रमामुळे नांदेड जिल्ह्यातील आरोग्य सेवांमध्ये सकारात्मक बदल दिसून येत आहे. ‘सुपोषित नांदेड’ हा उपक्रम एक आदर्श मॉडेल म्हणून उदयास येत असून, त्याचे अनुकरण जिल्ह्यांमध्येही सर्व ठिकाणी यशस्वी वाटचाल सुरु आहे. या यशामुळे नांदेड जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात एक नवीन उपक्रम सुरू आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी या विषयावर प्रास्ताविक केले. मग कामाचे नियोजन कसे करावे या विषयावर सविस्तर माहिती दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला असून कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी, महिला व बाल कल्याण अधिकारी प्रशांत थोरात, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार, स्वीय सहायक शुभम तेलेवार तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!