नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी काळेश्र्वर मंदिराजवळच्या पुलावर थांबलेल्या एका हायवा गाडीची तपासणी केली तेंव्हा त्यात अवैध वाळू भरलेली होती. पोलीसांनी 50 लाखांची हायवा आणि 25 हजारांची वाळू असा 50 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अंमलदार शंकर रेवण माळगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.14 ऑगस्टच्या सुर्योदय होण्याअगोदर 4.25 वाजता पोलीस उपनिरिक्षक बाबुराव चव्हाण, पोलीस अंमलदार संतोष जाधव, खलील बेग, गवेंद्र सिरमलवार, हनवता कदम आणि शंकर माळगे हे गस्त करत विष्णुपूरी येथील काळेश्र्वर मंदिराकडे जात असतांना मंदिराजवळील ब्रिजसमोर त्यांना एक बिना नंबर असलेली हायवा गाडी दिसली. याची तपासणी केली असता त्यात चोरट्या पध्दतीची वाळू भरलेली होती. हायवा गाडी 50 लाखांची आणि 25 हजारांची वाळू असा 50 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दाखल झालेला गुन्हा क्रमांक 774/2025 मध्ये आरोपी या सदरात राहुल केशव पवार(27) रा.गोटका तांडा ता.लोहा जि.नांदेड आणि अभिषेक साहेबराव पवार (25) रा.खरबी ता.लोहा जि.नांदेड यांची नावे आहेत. पोलीस उपअधिक्षक रामेश्र्वर व्यंजने, पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी कामगिरी करणाऱ्या पोलीसांचे कौतुक केले आहे.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध वाळूने भरलेली हायवा पकडली
