ऑपरेशन सिंदूर, सैन्य अधिकारी, आणि ‘केबीसी’: प्रश्न अनेक, उत्तर कुणाकडे?

‘ऑपरेशन सिंदूर’ चे नेतृत्व करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर भाजपच्या एका मंत्र्यांनी अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानास्पद शब्दांत टीका केली होती. मात्र, आजपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर एकही शब्द बोललेला नाही, आणि त्या मंत्र्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.आता, भारताच्या सैन्यातील तीन महिला अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमीका सिंह, आणि कमांडर विकासा देवस्थळी लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’ (केबीसी) मध्ये सहभागी होणार आहेत. या शोचे सूत्रसंचालन भारताचे सुपरस्टार अमिताभ बच्चन करतात. या कार्यक्रमात त्या ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात बोलणार असल्याचा प्रोमो टेलिव्हिजनवर दाखवला जात आहे.
या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात.
भारतीय सैन्यात कोणताही अधिकारी स्वतःच्या इच्छेने सार्वजनिक कार्यक्रमात, विशेषतः खाजगी टीव्ही शोमध्ये, सैन्याच्या गणवेशात सहभागी होऊ शकत नाही. यासाठी अधिकृत परवानगी आवश्यक असते. मग या तिघी अधिकाऱ्यांना ही परवानगी कोणी आणि कशी दिली?या महिला अधिकारी, एक थलसेनेतून, दुसरी वायुसेनेतून आणि तिसरी नौसेनेतून आहेत. त्या तिघीही ‘केबीसी’मध्ये आपापल्या अधिकृत गणवेशात उपस्थित राहणार आहेत. म्हणजेच, शासनस्तरावरूनच परवानगी मिळाल्याशिवाय हे शक्य नाही. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते. केंद्र सरकारने यासाठी मान्यता दिली आहे.मग प्रश्न असा निर्माण होतो की, या संपूर्ण प्रकरणामागे काही राजकीय हेतू आहेत का?

सैन्याचा वापर प्रचारासाठी?
भाजप सरकार असलेल्या देशात, सैन्याच्या महिला अधिकाऱ्यांना खाजगी टीव्ही शोमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल बोलायला पाठवले जात आहे, आणि हे सर्व सैन्याच्या गणवेशात. याचे राजकीय भान राखले जात आहे का? विंग कमांडर (नि.वृ.) अनुमा आचार्य, सध्या काँग्रेससोबत कार्यरत आहेत, म्हणतात की 2014 पूर्वी कधीही भारतीय सैन्याचा कोणताही अधिकारी ‘केबीसी’सारख्या कार्यक्रमात गणवेश घालून गेला, असा कोणताही दस्तऐवज किंवा उल्लेख उपलब्ध नाही.त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्य अधिकाऱ्यांना खासगी चॅनेलवर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी परवानगी देणे, हे ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या नावावर राजकीय गुण मिळवण्यासाठी केलेले पाऊल आहे, असा आरोप केला जात आहे.प्रियंका चतुर्वेदी यांनीही टीका करताना म्हटले की, “एशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना होणार आहे, आणि याचे प्रसारणही सोनी टीव्ही करत आहे. याच वेळी सैन्याच्या अधिकाऱ्यांना ‘केबीसी’मध्ये बोलायला लावणे, ही दुहेरी भूमिका आहे.”

मूक अमिताभ बच्चन आणि सरकारची भूमिका
या कार्यक्रमात तीन सैन्य अधिकारी अमिताभ बच्चन यांच्यासमोर ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात बोलणार आहेत. मात्र, अमिताभ बच्चन हे सामान्यतः कोणत्याही संवेदनशील राष्ट्रीय मुद्द्यावर बोलत नाहीत. त्यांच्यासमोर सैन्याचे अधिकारी आपले अनुभव मांडणार आहेत. हे कितपत योग्य आहे, हा देखील विचार करण्याचा मुद्दा आहे.लेफ्टनंट जनरल राहुल सिंह यांनी विचारले होते – “‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये केवळ पाकिस्तान नव्हता, तर चीन आणि बांगलादेशसुद्धा आमचे शत्रू होते.” पण या मुद्द्यांवर कोणीही खुलासा केलेला नाही.

सीडीएस अनिल चव्हाण म्हणाले होते की, “आमचे विमान कोसळले होते आणि दोन दिवस उड्डाण ठप्प झाले होते“. पण किती विमाने पडली, याचे कोणतेही अधिकृत उत्तर मिळालेले नाही.वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह यांनी तीन महिन्यांनंतर माहिती दिली की, “भारतीय हवाई दलाने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली आहेत“, पण आपल्या नुकसानाची आकडेवारी अजूनही दिलेली नाही. तेच त्यांनी सैन्याला लागणाऱ्या उपकरणांच्या खरेदी प्रक्रिया लालफितशाहीत अडकल्याचेही कबूल केले आहे.कॅप्टन शिवकुमार म्हणतात की, “राजकीय नेतृत्वाच्या ढिसाळ धोरणांमुळे सैन्याचे मोठे नुकसान झाले आहे,” पण याचेही उत्तर सरकारकडून मिळालेले नाही.

भाजप मंत्री वादात, पंतप्रधान शांत
मध्य प्रदेशातील भाजपचे एक मंत्री यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी अत्यंत खालच्या पातळीवरची टीका करत, “ती दहशतवाद्याची बहीण आहे,” असे विधान केले होते. एवढेच नव्हे तर, “मोदींच्या पायावर डोके ठेवायला हवे,” असेही म्हटले होते. मात्र, आजपर्यंत त्यांच्या विरोधात कुठलीही कारवाई झालेली नाही.निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे उल्लंघन करत 2019 च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी पहिले मतदान पुलवामातील शहीदांच्या नावावर करावे, असे मतदारांना आवाहन केले होते. ही भावना देशप्रेमाच्या आडून मतांचं राजकारण करण्याचा प्रयत्न नव्हता काय?
प्रचारासाठी सैन्याची गरज?
‘केबीसी’मध्ये अनेक अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते, चित्रपट प्रचार करणारे लोक जातात. त्यांना प्रसिद्धी हवी असते. पण सैन्याला प्रसिद्धीची गरज नाही. भारतीय सैन्य हे जगातील सर्वात प्रबळ सैन्यांपैकी एक आहे. त्यांचे कार्य आणि शौर्य जनतेला माहित आहेच. त्यामुळे सैन्याचा वापर केवळ प्रचारासाठी करणे, हे लाजिरवाणे व लोकशाहीसाठी धोकादायक आहे.
निष्कर्ष
आजवर कधीही सैन्य अधिकाऱ्यांचा उपयोग अशा खाजगी क्विझ शोमध्ये करण्यात आलेला नाही. आज हे घडते आहे, कारण ‘हे मोदी युग आहे’.वाचकांनी याचा विचार करायला हवा की, या सर्व प्रकरणात कोणती बाजू योग्य आहे? सैन्याच्या नावावर मतं मागणं, प्रचार करणं, आणि एकूणच संस्थांचा वापर राजकारणासाठी करणे, ही प्रवृत्ती रोखायला हवी की नाही?
