नांदेड (प्रतिनिधी)–नांदेड परिक्षेत्रातील (91) पोलीस ठाण्यांचे पोलीस कामकाजाशी संबंधित विषयावर दर महिन्यास परिक्षण करुन त्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्याची योजना नांदेड परिक्षेत्रात मागील नोव्हेंबर महिन्यापासून सुरु करण्यात आली आहे.
गुन्हे निर्गती, गुन्हे उघडकीस आणण्याचे व मालमत्ता हस्तगत करण्याचे प्रमाण, अर्ज चौकशी, चारित्र्य पडताळणी, पासपोर्ट, समन्स व वॉरंट बजावणी, फरारी व पाहिजे असलेले आरोपी अटक करणे, प्रतिबंधक कार्यवाही. दोषसिध्दी, सीसीटीएनएस, अभिलेख अद्यावतीकरण, अवैध व्यवसाय विरोधी कारवाई इत्यादी बाबत प्रत्येक पोलीस स्टेशनने केलेल्या कामगिरीचे दरमहा परिक्षण करण्यात येते.
उपरोक्त महत्वाच्या विषयात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन पोलीस ठाण्यांना प्रत्येक महिन्यास अनुक्रमे 5,000, 3,000 व 2,000 रुपयांचे बक्षीस व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येते.
नांदेड परिक्षेत्रातील पोलीस ठाण्यांच्या एप्रिल ते जुलै दरम्यानच्या परीक्षणात, नांदेड जिल्ह्यातील सोनखेड पोलीस ठाण्याने लागोपाठ चौथ्यांदा परिक्षेत्रात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. यामुळे, सोनखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पांडुरंग माने यांचा पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी प्रशस्तीपत्र व १० हजार रुपयांचे बक्षीस देऊन सन्मान केला आहे. त्यांच्या यशात, अर्थातच त्यांच्या सहकारी अधिकारी व अंमलदारांचा मोलाचा वाटा असल्याने त्यांचे देखील अभिनंदन करण्यात आले आहे.
गेल्या चार महिन्यांच्या परीक्षणात, सोनखेड पोलीस ठाण्याने सर्वच विषयांत सरस कामगिरी केली आहे. सोनखेड पोलीस ठाण्यात यावर्षी दाखल झालेल्या मालाविरुद्धच्या एकूण 78 गुन्ह्यांपैकी त्यांनी तब्बल 74 गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळवले आहे. त्याचप्रमाणे, यावर्षी विविध प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या एकूण (643) प्रलंबित मुद्देमालांपैकी (333) मुद्देमालांची निर्गती करण्यात आली असून, नागरिकांकडून प्राप्त झालेले अर्ज, चारित्र्य पडताळणी व पासपोर्ट प्रकरणे यांची प्रलंबितता त्यांनी शून्यावर आणली आहे. आज मितीस, सोनखेड पोलीस ठाणे येथील प्रलंबित गुन्हे प्रकरणांची संख्या ही केवळ (7) एवढी आहे.
चालू महिन्याच्या म्हणजे जुले महिन्याच्या परीक्षणात, हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा व नांदेड जिल्ह्यातील सिंदखेड यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांच्या कामगिरीची देखील दखल घेऊन त्यांना प्रशंसापत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले आहे.
