नांदेड(प्रतिनिधी)-जैविक खतांच्या सोसायट्यांमध्ये शेतकऱ्यांना थेट किरकोळ विक्री न करता होणाऱ्या काळा बाजाराबद्दल धनराज मंत्री यांनी अनेक पत्र दिल्यानंतर सुध्दा जिल्हा उपनिबंधक, जिल्हा कृषी अधिक्षक यांच्यावर कार्यवाही करण्याचा जबाबदारीला ढकलत आहेत. म्हणजे असा खोटा कारभार सर्वत्र सुरू आहे. आजपासून धनराज बद्रीनारायण मंत्री यांनी जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
नांदेड येथील धनराज बद्रीनारायण मंत्री यांनी दि.8 ऑगस्ट 2025 रोजी त्यापुर्वी 2 जानेवारी 2025 रोजी, 2 जुलै 2025 रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालय सहकारी संस्था यांना पत्र दिले. त्या पत्रानुसार शेतकऱ्यांना जैविक खत्यांच्या वाटपासाठी खतांच्या सोसायट्या उपनिबंधक कार्यालयामार्फत उभ्या करण्यात आल्या आहेत. ज्या सोसायट्यांमधील उपविधीनुसार आजपर्यंत एकही खताचे पोते थेट शेतकऱ्यांना विक्री केलेले नाहीत. मागील 24 वर्षापासून स्वत:च्याच दुकानात कागदोपत्री खतांचा व्यवहार बदलला जातो आणि रेल्वे रॅक पॉईंटवरूनच खतांची चढ्या दराने काळ्या बाजारात विक्री होते. त्यावर कार्यवाही व्हावी अशी या अर्जांची मागणी आहे.
या संदर्भाने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी धनराज मंत्री यांना सांगितले की, देवगिरी जैविक खत उत्पादक, केदारनाथ जैविक खत उत्पादक, आनंदी माता शेती उपयोगी संस्था, संत बाळगिर महाराज शेती उपयोगी साधन सामुग्री संस्था, नंदीग्राम शेती उपयोगी संस्था, गोदावरी जैविक संस्था, संतकृपा जैविक सहकारी संस्था यांची चौकशी केली. परंतू या अहवालात या संस्थांना कृषी विभागाकडून परवाने देण्यात येतात. म्हणून ही कार्यवाही कृषी विभागाने करावी असे नमुद केले. तर कृषी कार्यालयाने धनराज मंत्री यांना सांगितले की, खते सहकारी संस्था यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याचे अधिकार डीडीआर कार्यालयास असल्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे विचारणा करावी.
या दोन वेगवेगळ्या उत्तरांमुळे हे स्पष्ट दिसते की, दोन विभाग एक दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुक ठेवत आहेत. आजचा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे आणि त्यात त्या शेतकऱ्यांना त्यांना आवश्यक असलेले जैविक खत योग्य वेळेत आणि योग्य दरात मिळणे आवश्यक आहे तरी दोन विभाग एक दुसऱ्याच्या खांदावर बंदूक ठेवू आमची जबाबदारी नाही असे सांगत आहेत.
खत नियंत्रक प्रयोग शाळा पुणे येथून एका खताच्या चाचणीमध्ये त्यात झिंक हा पदार्थ नसल्याचा अहवाल आला आहे. एकूणच या सर्व खोटारड्यापणामुळे धनराज मंत्री यांनी आजपासून कृषी अधिक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या खतांच्या घोटाळ्यात दोन विभागांची एक दुसऱ्यावर चालढकल
