नियम धाब्यावर, गर्भगृहात जबरदस्ती – खासदार दुबे यांच्या विरोधात धार्मिक संताप  

धर्मरक्षणी महासभेचे महामंत्री श्री कार्तिकनाथ ठाकूर यांनी झारखंड राज्यातील भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आता त्यांना अटक करायची की नाही, हे हेमंत सोरेन सरकार आणि पोलिस यंत्रणेने ठरवायचं आहे.

श्री ठाकूर यांनी आरोप केला आहे की बाबा बैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद असून, गर्भगृहात प्रवेश वर्ज्य आहे, तरीही निशिकांत दुबे यांनी नियम धाब्यावर बसवत जबरदस्तीने मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करून त्या पवित्र स्थळाची अवहेलना केली.२ ऑगस्ट रोजी त्यांनी मंदिराच्या गर्भगृहात आणि बाहेर जाणाऱ्या मार्गावरून जबरदस्तीने प्रवेश केला, असा आरोप श्री ठाकूर यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला आहे. त्यानुसार बाबा बैद्यनाथ धाम पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 4/2025 दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील एकूण १९ कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकारात निशिकांत दुबे यांच्यासह त्यांचा मुलगा कनिष्क कांत दुबे, शेषाद्री दुबे, दिल्लीचे खासदार मनोज तिवारी आणि इतर काही जण सहभागी असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. मंदिराचे पूजारी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु ते काही ऐकत नव्हते.श्री कार्तिकनाथ ठाकूर म्हणतात, “मी बाबाचा भक्त आहे. ईश्वराने मला जेवढे श्वास दिले आहेत, ते घेण्यापासून जगात कोणताही माणूस मला रोखू शकत नाही. आणि त्या श्वासांमध्ये कोणी नवीन श्वास जोडू शकत नाही. जर काही चुकीचे घडत असेल, तर त्याविरोधात उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे. परिणाम काहीही असो, तो ईश्वराच्या हाती आहे.”

निशिकांत दुबे यांच्याबाबत ते म्हणतात, “ते कुख्यात आहेत, हे मला माहिती आहे. ते काहीही करू शकतात, करवून घेऊ शकतात. पण मला माझ्या बाबांवर पूर्ण आस्था आणि विश्वास आहे. मी श्रद्धेच्या बळावर चुकीच्या गोष्टींचा विरोध करत आलो आहे.”निशिकांत दुबे हे या भागाचे खासदार आहेत आणि लहानपणापासून याच परिसरात वाढले आहेत. त्यामुळे मंदिराच्या परंपरांची माहिती त्यांना असणे साहजिक आहे. कांचा जलपूजेच्या दिवशी, पूजेच्या नंतर कोणालाही गर्भगृहात प्रवेश दिला जात नाही, हे त्यांनाही माहीत आहे. परंतु त्या दिवशी, श्री ठाकूर यांच्या मते, “त्यांचा विवेकच मरण पावला होता.”

श्री ठाकूर पुढे म्हणतात, “ही तीच भूमी आहे जिथे जगद्जेता रावणसुद्धा बाबाला हलवू शकला नाही. त्यालाही येथे आपला अहंकार सोडावा लागला. बाबा बैद्यनाथ हे असे स्थान आहे, जेथे प्रत्येकाचा अहंकार संपतो.”दुबे म्हणतात की ते ट्रस्टी आहेत, परंतु वास्तवात ते फक्त बैद्यनाथ मंदिराच्या शासकीय बोर्डाचे एक सदस्य आहेत. त्यामध्ये अनेक सदस्य असतात. अध्यक्ष स्वतः मुख्यमंत्री असतात. जलपूजेच्या दुसऱ्या दिवशी आमच्यासारखे भक्तसुद्धा बाबांना स्पर्श करू शकत नाहीत, अशी परंपरा अनेक शतकांपासून सुरू आहे, असे श्री ठाकूर सांगतात.

निशिकांत दुबे यांनी जाहीरपणे सांगितले की, “मी स्वतः अटक होण्यासाठी येणार आहे.” यावर प्रतिक्रिया देताना श्री ठाकूर म्हणाले, “हे झारखंड पोलिसांसाठी आव्हान आहे की एक नवा खेळ? त्यांनी स्वतःहून अटक झाली, तर पोलिसांना दिल्लीला जाण्याचा खर्च वाचेल.”श्री ठाकूर यांनी आश्चर्य व्यक्त केले की, “आम्ही जेव्हा रांची उच्च न्यायालयात अर्ज करतो, तेव्हा आमचा नंबर येण्यास महिन्यांनी वाट पाहावी लागते. मात्र दुबे यांचे काम त्वरित कोर्टात घेतले जाते, आदेशही निघतात आणि त्यांना तत्काळ दिलासा मिळतो.”

“व्हिक्ट्री चिन्ह दाखवत ते इतरांचा उपहास करतात. पण मला खात्री आहे की बाबा एक दिवस याचा हिशोब नक्कीच करतील. सत्याचा विजय आणि असत्याचा पराभव हे अटळ आहे. घमंड कधी ना कधी तुटणारच आहे.”शेवटी श्री ठाकूर म्हणतात, “आता वेळ आली आहे. बाबा न्याय देताना प्रत्येकाला तो काय आहे हे दाखवून देतील.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!