शेत जमीनीचा ताबा बळजबरीने घेण्याप्रकरणी अक्षय रावत, वच्छलाबाई पुयड सह आठ जणांचा अटकपुर्व जामीन नाकारण्यात आला

नांदेड(प्रतिनिधी)-नेरली येथील गट क्रमांक 196/2 मधील 20 गुंठे जमीनीचा ताबा घेण्यासाठी दोन गटांनी आपसात मारहाण केल्याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात वच्छलाबाई पुयड, अक्षय रावत, सुरेखा गायकवाड, सय्यद तयब अली सय्यद रौफअली यांच्यासह 8 जणांचा अटकपुर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने नाकारले आहेत.

दि.17 जुलै 2025 रोजी सकाळी 8 वाजता नेरली गावात दोन गटांमध्ये जोरदार भांडण होत असल्याची माहिती भाग्यनगर पोलीसांना मिळाल्यानंतर पोलीस उपनिरिक्षक हनमंत रामराव शिंदे आणि त्यांचे अनेक सहकारी तसेच डायल 112 चे वाहन आणि त्यातील कर्मचारी नेरली गावात पोहचले. त्या ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर दोन गट आपसात झुंजत असतांना, एक दुसऱ्याला शिव्या देवून काठ्यांनी मारहाण करत असतांना दिसले. आम्ही तेथे गेल्यानंतर ते पळून गेले असे हनमंत शिंदे यांनी आपल्या तक्रारीत लिहिले आहे. हनमंत शिंदे यांच्या तक्रारीवरुन भारतीय न्याय संहितेच्या कलम 194(2), 189(2)190, 191(2), 115(2), 118(1) आणि 552 प्रमाणे गुन्हा क्रमांक 414/2025 दाखल करण्यात आला. पोलीस निरिक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे यांच्याकडे हा तपास देण्यात आला.

हा घटनाक्रम नेरली गावातील गट क्रमांक 196/2 मधील 20 गुंठे जमीनीचा ताबा मिळविण्यासाठी झाला होता. या प्रकरणी पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे यांनी मोहम्मद रफीक अब्दुल रशीद (40), अब्दुल समद अब्दुल रशिद(37) दोघे रा.इतवारा नांदेड, सय्यद इस्माईल उर्फ गुड्डू महेबुब (33), सय्यद अफरोद सय्यद रौफअली (30), सय्यद बारी सय्यद महेबुब (38) सर्व रा.नांदुसा ता.जि.नांदेड या पाच जणांना अटक केली. न्यायालयाने त्यांना काही दिवस पोलीस कोठडीत पाठविले होते. या प्रकरणात एकूण 19 आरोपींची नावे आहेत. 19 व्या क्रमांकावर 10 ते 15 लोक असा उल्लेख आहे. त्यातील अक्षय भानुसिंह रावत, वच्छलाबाई पुयड, सुरेखा उर्फ संजना गायकवाड, नलोफर बेगम चाऊस, सय्यद तयब अली सय्यद रौफअली, सय्यद अकबर सय्यद महेबुब , हैदरअली रौफअली, शेख लायक शेख अफसर या आठ जणांनी जिल्हा न्यायालयात अटकपुर्व जामीन अर्ज सादर केला होता.

या प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने ऍड. रणजित देशमुख, ऍड. एम.ए.बत्तुला,  ॲड. गजानन खिल्लारे ,यांनी पाहिले. न्यायालयासमोर उपस्थित केलेल्या कायदेशीर मुल्यांना गृहीत धरुन सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणाऱ्या या आठ जणांना अटकपुर्व जामीन नाकारण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!