गडकरींची “शांत बंडखोरी” संसदेत झळकली – भाजप हाय कमांडवर प्रश्नचिन्ह

मागील अकरा वर्षे केंद्रात सत्तेत असलेल्या एनडीए सरकारमध्ये नितीन गडकरी हे असे एक मंत्री आहेत, जे आहे ते स्पष्ट बोलणे’ या तत्वावर ठाम राहिले आहेत. ते नेहमीच सत्य, कडक आणि स्पष्ट भाषेत बोलतात. त्यामुळे विरोधी पक्षातील अनेक नेतेही त्यांचा आदर करतात. अशा परिस्थितीत ‘ऑपरेशन सिंदूर’ प्रकरणावर उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत आले होते. उत्तर देऊन परत जात असताना नितीन गडकरी यांनी केलेल्या शारीरिक हालचालींनी एक वेगळीच चर्चा निर्माण केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहातून निघत असताना, त्यांच्या उजव्या बाजूला राजनाथ सिंह, त्यानंतर अमित शहा आणि शेवटी नितीन गडकरी उभे होते. मोदींनी हात जोडले, त्यानंतर राजनाथ सिंह आणि अमित शहा यांनीही हात जोडले. मात्र गडकरी यांनी हात मागे बांधलेले होते आणि ते शांतपणे मोदींकडे पाहत राहिले. त्यांनी कोणताही अभिवादनाचा प्रतिसाद दिला नाही. या दृश्याचा व्हिडिओ संसदेतूनच समोर आला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. अनेक लोकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या असून काही जण गडकरींच्या शांततेतून व्यक्त होणाऱ्या बाणेदार भूमिका अधोरेखित करत आहेत.
राजकीय विश्लेषकांच्या मते, गडकरींच्या अशा हालचाली हे सूचक आहेत. काहींनी असा अंदाजही व्यक्त केला आहे की, भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) हाय कमांड नेतृत्वाशी गडकरींचे संबंध तणावपूर्ण झाले असून, आरएसएसकडून (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) त्यांना ‘हिरवा सिग्नल’ मिळाल्याची शक्यता आहे.याआधीही अशा चर्चा सुरू होत्या की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आणि त्याआधी, भाजपमध्ये ‘गुजराती लॉबी’चा प्रभाव वाढल्यापासून गडकरींना बाजूला सारले जात आहे. महाविकास आघाडीच्या वतीने त्यांना पंतप्रधान पदाची ऑफर देण्यात आली होती, हे त्यांनी एका जाहीर सभेत सांगितलेही होते.
गडकरी यांनी अनेक वेळा सत्ता, संपत्ती आणि सौंदर्य यामुळे निर्माण होणाऱ्या अहंकारावर भाष्य केले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, “सत्ता मिळाल्यानंतर लोकांचा अहंकार वाढतो. अशा अहंकारामुळे कोणी मोठं होत नाही. इतिहास आणि जगाचा अभ्यास करा, तर असे जबरदस्तीचे विचार कधीच टिकत नाहीत.”गडकरी यांचे हे वक्तव्य अनेकांना अप्रत्यक्षपणे भाजप नेतृत्वावर टीका वाटली होती. त्यामुळेच अनेकजण असे म्हणतात की, ते पंतप्रधान पदासाठी किंवा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी योग्य पर्याय ठरू शकतात,कारण ते आरएसएसच्या पसंतीचे नेते आहेत.गडकरी यांनी एकदा असेही म्हटले होते की, “शिक्षकाच्या अप्रूव्हलसाठीही लाच द्यावी लागते. पण मी बदलणार नाही. मी माझ्या तत्त्वांशी तडजोड करणार नाही. पारदर्शकता व इमानदारी ही दीर्घकाळ टिकणारी संपत्ती आहे.”त्यांनी असेही सांगितले होते की, समाजात काही लोक असे असायला हवेत जे प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करतात. त्यामुळेच राजकारणात शिस्त व शिष्टाचार टिकून राहतो.
यावरून असा प्रश्न उपस्थित होतो की, गडकरी यांना आरएसएसकडून काही विशिष्ट भूमिकेसाठी पाठिंबा मिळतो आहे का? काही दिवसांपूर्वी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी वयाचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘सेवानिवृत्तीची वेळ झाली आहे’ असा सूचक इशारा दिला होता.ही ओढाताण केवळ संघ-भाजप संबंधांपुरती मर्यादित नसून, उच्च नेतृत्वामध्ये अंतर्गत असंतोष उफाळून येत असल्याचेही संकेत आहेत.‘ऑपरेशन सिंदूर’ प्रकरणावर उत्तर देऊन परतणाऱ्या नरेंद्र मोदींच्या समोर, शांतपणे उभ्या असलेल्या गडकरींच्या हालचाली जरी काही न बोलता बोलणाऱ्या असल्या, तरी त्यामागचा अर्थ मात्र अनेकदाच स्पष्ट आणि ठाम वाटतो. त्यामुळेच राजकीय वर्तुळात ही चर्चा अधिकच गडद झाली आहे की, नितीन गडकरी आगामी काळात भाजप किंवा राष्ट्रीय राजकारणात एक स्वतंत्र भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत काय?

