नांदेड (प्रतिनिधी) : सत्यशोधक साहित्य सम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती निमित्त लोकस्वराज्य आंदोलन व अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने शुक्रवार दि. १ ऑगष्ट २०२५ रोजी दुपारी १२ वा. नांदेड शहरातील डॉ. अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात सामाजिक न्याय महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.
अशी माहिती लोकस्वराज्य आंदोलनचे मराठवाडा प्रवक्ते सचिन वाघमारे तसेच समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गंगाधर गंगासागरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली असून मातंग व ढोर मोची चांभार होलार भंगी बुरुड आदी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या सामाजिक न्याय महा सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
या सामाजिक न्याय महासभेला लोकस्वराज्य आंदोलनचे संस्थापक प्रा. रामचंद्रजी भरांडे तसेच प्रा. हरीश्चंद्र नकुल्लवार (मादगी समाज संघटना मुंबई), इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर (संस्थापक, अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद) यांची प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती राहणार आहे.
या सामाजिक न्याय महासभेचे उदघाटन प्रदेशाध्यक्ष ॲड. नितीन पौळ यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथि म्हणून रावसाहेबदादा पवार, व्ही. जी. डोईवाड, ॲड. दत्तराज गायकवाड, नामदेव फुलपगार, शिवानंद जोगदंड, प्रकाश कामळजकर, भीमराव वाघमारे, संतोष सुर्यवंशी, श्रीनिवास कांबळे, लक्ष्मण वाघमारे, गणपत रेड्डी, हनमंत नामकार, नागोराव नामेवार, धोंडोपंत बनसोडे, रमेश गंगासागरे, बालाजी बंगारीकर, राहुल गोरे, संजय बनसोडे, अर्जुन गायकवाड, हणमंत उतकर, कामाजी वाघमारे कृष्णुरकर आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
महाराष्ट्रात लोकस्वराज्य आंदोलन या सामाजिक संघटनेचे नेते प्रा. रामचंद्रजी भरांडे यांच्या नेतृत्वात अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करुन, लाभवंचित जाती समुहांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व द्यावे, यासाठी मागील तीस वर्षापासून सामाजिक न्यायाचा लढा लढला जात आहे. लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने मुंबई व नागपूर अधिवेशनावर महापदयात्रा काढल्या तर एवढेच नाही सन २०१५ ला नागपूर येथील हिवाळी अधिवेशन काळात समाज बांधवांनी रक्त सांडले.
दि. १० जुलै २०२५ रोजी आझाद मैदान मुंबई येथे पावसाळी अधिवेशन दरम्यान लोकस्वराज्य आंदोलनने महा एल्गार आंदोलन केले. त्यात अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेने सक्रीय सहभाग घेतला. अनुसूचित जात समुहाचे प्रश्न घेऊन भविष्यात सामुहिक आंदोलने करण्याचा निर्धार प्रा. रामचंद्र भरांडे आणि इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केला असून या पार्श्वभूमीवर १ ऑगस्टची नांदेडची सामाजिक न्याय महासभा महत्वाची ठरणार आहे.
