नांदेड,(प्रतिनिधी)– गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नांदेड शहरासह संपूर्ण जिल्हा अक्षरशः धुवून निघाला आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून, काही ठिकाणी नागरिकांच्या घरातही पाणी शिरले आहे. त्यामुळे महापालिकेच्या “आम्ही सज्ज आहोत” या दाव्यांची पोलखोल झाली आहे.
महानगरपालिका अधिकारी याआधी दंड वसूल करत “आम्ही सर्व तयारीत आहोत” असे सांगत होते. मात्र, आता परिस्थिती हाताबाहेर गेली असून, “पाऊस थांबवू शकतो का?” असा सवाल त्यांच्याकडूनच ऐकायला मिळत आहे.काल सकाळपासून सुरू झालेला पाऊस काही काळ थांबतो आणि पुन्हा अधिक जोराने कोसळतो, अशी स्थिती दिवसभर कायम आहे. नागरिकांनी पाठवलेल्या फोटो आणि व्हिडिओंमधून हे स्पष्ट होते की, हीच परिस्थिती केवळ नांदेडमध्ये नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाली आहे.असा इशाराही येत आहे कि येत्या २-३ तासात महाराष्ट्रात आणि नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार आहे.
नांदेड शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले असून, घरात पाणी घुसल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्ते, गल्लीबोळांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला आहे.निसर्गावर कोणाचेही नियंत्रण नसले तरी, अशा परिस्थितीत आपल्याला “आलिया भोगासी असावे सादर” या संतवचनाची आठवण होते. पावसाची गरज असली तरी, या प्रमाणातील अतिवृष्टीमुळे संकट ओढावले आहे, असे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे.सध्याच्या स्थितीत नागरिकांनी आपली आणि आपल्या शेजाऱ्यांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाने देखील तातडीने मदत कार्य सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आज सायंकाळी विष्णुपुरी धरणाचा एक दरवाजा उघडला आहे त्यामुळे गोदावरी नदीत सुद्धा पाणी वाढणार आहे नागरिकांनी याबद्दल दक्षता घ्यावी असे वास्तव न्यूज लाईव्ह च्या वतीने सुद्धा विनंती चे शब्द आहेत.
