नांदेड– मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 5 वर्ष इतका करण्यात आला असल्याबाबत बनावट शासन निर्णय समाजमाध्यमावरुन प्रसारित होत असल्याचे 14 जुलै 2025 रोजी निर्दशनास आले आहे. तरी सर्वसामान्य नागरिक, संबंधित प्रशिक्षणार्थी, योजना राबवित असलेल्या शासकीय निमशासकीय, खाजगी आस्थापना यांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.
राज्यातील युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून रोजगार मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. परंतु या योजनेअंतर्गतचा बनावट शासन निर्णय हा निखासल खोटा असून प्रशिक्षणार्थ्यांच्या तसेच सर्वसामान्य जनतेच्या फसवणूकीचा तसेच दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणाचा कालावधी 5 वर्ष करण्याचा कोणताही शासन निर्णय शासनाने घेतला नाही यांची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
