नांदेड –शहरातील युवा नेते बंटीभाऊ लांडगे यांनी आपल्या शेकडो समर्थकासह आ.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पक्षात जाहिर प्रवेश केला. यावेळी अजितदादा पवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून बंटी लांडगे यांच्यासह समर्थकांना प्रवेश देण्यात आला.
नांदेड शहरातील मागील अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे तसेच नेहमीच अडीअडचणीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांच्या हाकेला धावून जाणारे कार्यकर्ते म्हणून बंटीभाऊ लांडगे यांची ओळख आहे. सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ असो की त्यांच्या सार्वजनिक अडचणी असो त्या सोडविण्यासाठी बंटीभाऊ नेहमीच पुढाकार घेत असतात. शहरातील अस्वच्छता, नियमित पाणीपुरवठा, सार्वजनिक ठिकाणी लाईट असे अनेक सामाजिक मुद्दे घेवून त्यांनी प्रशासनाकडे याचा पाठपुरावा केला आहे. या कार्याची दखल घेत त्यांना वेगवेगळे पुरस्कारही मिळाले आहेत. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षाकडून सक्षम व प्रबळ कार्यकर्त्याला आपल्याकडे घेण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आ.प्रताप पाटील चिखलीकर यांनी बंटी लांडगे यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांच्या सारखा सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी धावून जाणारा कार्यकर्ता आपल्या पक्षात यावा यासाठी प्रयत्न केले. आगामी निवडणुकीत बंटी लांडगे यांच्या प्रवेशामुळे पक्षाला फायदा होऊ शकतो असा विश्वास चिखलीकर यांनी व्यक्त केला. दि.15 रोजी मुंबई येथे पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासह नेतेमंडळीच्या उपस्थितीत बंटी लांडगे यांनी आपल्या शेकडो समर्थकासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून येणार्या काळात राष्ट्रवादीच्या माध्यमातून सरकारच्या विविध योजना सर्वसामान्यां पर्यंत पोहोचवून पक्षसंघठन वाढीसाठी प्रयत्न करू असे बंटी लांडगे यांनी सांगितले.
