नांदेड(प्रतिनिधी)-कर्करोगाने ग्रस्त आपल्याच भावाची जमीन हडप करण्याच्या उद्देशाने त्यांचेच भाऊ आणि त्यांचे इतर साथीदार त्रास देत असल्याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मौजे काकांडी ता.जि.नांदेड येथील प्रेमचंद सदाशिव भवर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार काकांडी शिवारातील गट क्रमांक 238 मध्ये त्यांच्या मालकीची 3 हेक्टर 8 आर आणि शेत गट क्रमांक 246 मध्ये 74 आर अशी जमीन आहे. ती वडिलोपार्जित पध्दतीने त्यांना प्राप्त झालेली आहे. ते कर्करोगाने पिडीत आहेत. पती-पत्नी आणि दहा वर्षाचा मुलगा असे त्यांचे कुटूंब आहे. काही लोकांच्या मदतीने लाखो रुपये खर्च. करून ते आपल्या कर्करोगावर उपचार घेतात.
14 जुलै रोजी ते आणि त्यांच्या पत्नी शेत गट क्रमांक 238 मध्ये गेले असतांना त्यांचे भाऊ हनमंत सदाशिव भवर आणि शरद सदाशिव भवर यांनी अनाधिकृतपणे त्यांच्या शेतात प्रवेश करून सांगितले की, तुम्ही दोघे शेतामध्ये का आलात. आम्ही सोयाबीन पेरले आहे, शेताच्या बाहेर जाता की, तुमचे हातपाय तोडावे असे सांगून माझ्या शेतातील सोयाबीन पिकांची नासधुस केली आणि 25 हजार रुपयांचे नुकसान केले आहे.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 329(3), 352, 351(2), 351(3), 324(4), 3(5) नुसार हनुमंत सदाशिव भवर आणि शरद सदाशिव भवर यांच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 673/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक संभाजी व्यवहारे यांच्याकडे देण्यात आला आहे.
कर्करोगाने ग्रस्त भावाला त्रास देणाऱ्या सख्या भावांविरुध्द गुन्हा दाखल
