शाळा परवानगीविना दुसरीकडे नेल्याचा आरोप; बॅनर मदरशावर, शाळा मात्र जुन्याच ठिकाणी सुरू
अर्धापूर (प्रतिनिधी) – दर्गा मोहल्ला, अर्धापूर येथील डॉ. एकबाल उर्दू मॉडल हायस्कूल अर्धापूर ही शासनमान्य शाळा असून तिची मूळ परवानगी ही दर्गा मोहल्ला येथील पत्त्यावर आहे. मात्र, अर्धापूर एज्यूकेशन सोसायटी या संस्थेचे वादग्रस्त अध्यक्ष सय्यद वसीम बारी सय्यद शमसुद्दीन यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता शाळेचे अनधिकृत स्थलांतर जवळपास दीड किलोमीटर दूर असलेल्या जम जम फंक्शन हॉलच्या मागे असलेल्या मदरसा इमारतीत केल्याचा गंभीर आरोप पालक आणि स्थानिक नागरिकांनी केला आहे.
या स्थलांतरास कोणतीही वैधानिक मान्यता नसताना, शाळेचे फलक (बॅनर) मात्र मदरसा इमारतीवर लावण्यात आले असून प्रत्यक्षात शाळा मात्र जुने ठिकाण – दर्गा मोहल्ला येथेच सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे.
शासनाच्या नियमांची पायमल्ली?
शाळेच्या स्थलांतरासाठी शिक्षण विभागाची आगाऊ परवानगी घेणे बंधनकारक असून तसे आदेश शिक्षण अधिकार्यांच्या परिपत्रकांद्वारे वेळोवेळी निर्गमित झाले आहेत. परंतु, सदर प्रकरणात कोणतीही अधिसूचना न घेता आणि पालक, विद्यार्थी यांची माहिती न देता झालेल्या या स्थलांतरामुळे शाळेचे व्यवस्थापन संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
पालक आणि नागरिक आक्रमक
या प्रकारामुळे पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “शाळा कुठे सुरू आहे? कोणते पत्ते बरोबर आहेत? आणि उद्या यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले तर जबाबदार कोण?” असा प्रश्न पालक विचारत आहेत.
शासनाचे लक्ष वेधले जाणे गरजेचे
या प्रकरणात संबंधित शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद व धर्मदाय आयुक्त कार्यालय यांनी तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व पालक वर्गाकडून केली जात आहे.
