नांदेड(प्रतिनिधी)-349 लोकांची अर्थात ठेवीदारांची 96 लाख 70 हजार 195 रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन भावांना 8 महिन्यानंतर अटक करण्यात आली. या दोघांना दुसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी 9 जून 2025 पर्यंत अर्थात पाच दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणात एका महिलेला न्यायालयाने अंतरीम जामीन मंजुर केलेला आहे.
दि.7 सप्टेंबर 2024 रोजी कुरूंदा ता.वसमत जि.हिंगोली येथील गंगाधर विश्र्वनाथ देलमाडे यांनी तक्रार दिली की, तरोडा नाका भागातील राजेंद्रनगर मध्ये रायझिंग लाईट इंटरप्राईझेस प्रा.लि. कार्यालय आहे. त्यांनी माझ्याकडून अधिक व्याजाचे आमिष दाखवून 10 लाख 25 हजार 925 रुपयांची गुंतवणूक करायला लावली. अधिकचे व्याज तर सोडाच पण मला माझी मुदल रक्कम पण परत दिली नाही. हा सर्व प्रकार 25 सप्टेंबर 2014 ते 26 ऑक्टोबर 2015 दरम्यान घडला. या संदर्भाने भाग्यनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 438/2024 दाखल केला. या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेची कलमे 420, 34 आणि 3, 4 महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 जोडण्यात आले. या गुन्ह्याच्या आरोपी सदरात राजू लिंबाजीराव बुधवंत (53) आणि संजय लिंबाजीराव बुधवंत (40) आणि यातील राजूच्या पत्नीचे नाव तसेच रायझिंग इंटरप्राईझेसचे नाव आरोपी सदरात आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस निरिक्षक गुन्हे एम.एस.माळी यांच्याकडे आहे.
आज 4 जून रोजी न्यायालयात सादर केलेल्या माहितीप्रमाणे राजू लिंबाजीराव बुधवंत आणि त्यांचा भाऊ संजय लिंबाजीराव बुधवंत यांना 4 जूनच्या मध्यरात्रीनंतर 12.46 वाजता अटक करण्यात आली. दुपारी 3 वाजता पोलीस निरिक्षक एम.एस.माळी यांनी दोन्ही बुधवंत बंधूंना न्यायालयात हजर केले. जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख यांनी न्यायालयासमोर सादर केले की, आजपर्यंत 349 ठेवीदारांनी तक्रारी दिल्या आहेत. त्यांची एकूण फसवणूक 96 लाख 70 हजार 195 रुपयांची झालेली आहे. या गुन्ह्यातील दस्तऐवज जप्त करणे आहे, आरोपींच्या हस्ताक्षरांचे नमुने घ्यायचे आहेत. संगणकांचे सीपीओ प्राप्त झाले आहेत. परंतू हार्डडिस्क जप्त करायची आहे. फसवणूक केलेल्या जवळपास 1 कोटी रुपयातील रक्कम या आरोपींनी आपल्या नातलगांच्या नावांनी किंवा इतरांच्या नावांनी कोठे गुंतवणूक केली आहे काय याचा शोध घ्यायचा आहे. यासाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी. या प्रकरणात आराीेपींच्यावतीने सुध्दा बचाव करण्यात आला. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून दुसऱ्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी राजू बुधवंत आणि संजय बुधवंत या दोघांना पाच दिवस अर्थात 9 जून 2025 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
जवळपास 1 कोटींची फसवणूक करणाऱ्या दोन भावांना पाच दिवस पोलीस कोठडी
