नांदेड,(प्रतिनिधी)-अर्धापूर येथील पोलीस उप अधीक्षक कार्यालयात कार्यरत पोलीस उपनिरीक्षकाने एका खाजगी व्यक्ती सह तक्रारदाराला जनावर वाहतूक वाहनावर कार्यवाही न करण्यासाठी आणि इतरांना न करू देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चाहूल लक्षात आल्यानंतर ते दोघे फरार झाले आहेत.आता त्या दोघांविरुद्ध लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्याकडे एक लोडिंग ऑटो वाहन आहे. जनावरांची वाहतूक तो करतो. त्याची जनावर वाहतूक करु देण्यासाठी अर्धापूर येथील पोलीस उप अधीक्षक कार्यालयात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक आयुब कुरेशी हे पन्नास हजार रुपये लाचेची मागणी करीत आहे. अशी तक्रार त्याने 23 मे 2025 रोजी दिली होती. त्यानंतर तक्रारदाराच्या सोबत पंच पाठवून 24 मे रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. तेव्हा पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख याने आपल्या पदाचा गैरवापर करून स्वतःचा अनुचित आर्थिक फायदा करून घेण्यासाठी त्याच्या लोडिंग ऑटोवर कोणतीही कार्यवाही न करण्यासाठी लाच मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासोबत राहणारा खाजगी इसम राजू भिसे पाटील याने पोलीस उपनिरीक्षक आयुब कुरेशी याच्यासाठी लाच स्वीकारण्यास सहमती दिली. 50 हजार लाच यासाठी होते की कुरेशी तक्रारदाराच्या वाहनावर कार्यवाही करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाही. नंतर 26 मे आणि 28 मे रोजी लाच स्वीकृती साठी दोनदा सापळा रचण्यात आला. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची चाहूल लागताच पोलीस उपनिरीक्षक शेख आयुब कुरेशी आणि खाजगी इसम राजू भिसे पाटील यांनी लाच स्वीकारली नाही. नंतर काल इतवारा पोलिस ठाण्यात लाच मागणी संदर्भाने दोघां विरुद्ध लाच मागणीचा गुन्हा करण्यात आला आहे. सध्या पोलीस उपनिरीक्षक शेख आयुब कुरेशी आणि खाजगी इसम राजू भिसे पाटील फरार आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पालवे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संजय तुंगार, पोलीस उप अधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रीती जाधव, पोलीस अंमलदार बालाजी मेकाले,अरशद अहमद खान, सय्यद खदीर, गजानन राऊत, प्रकाश मामूलवार यांनी पूर्ण केली.
