नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील सैन्यातील जवान सचिन वनंजे यांचे आपल्या नवीन नियुक्तीच्या पोस्टवर जातांना झालेल्या अपघातात त्यांचे निधन झाले आहे. या शहिदाचे मृतदेह काश्मिरमधून रवाना करण्यात आले आहे. उद्या रात्री त्यांच्यावर तमलूर ता.देगलूर येथे त्यांच्या मुळगावी अंतिमसंस्कार करण्यात येणार आहेत.
नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातील तमलुर गावचे सचिन यादवराव वनंजे हे 2017 मध्ये भारतीय सैन्य दलात सामील झाले होते. त्यांची प्रथम नियुक्ती सियाचिन भागात झाली होती. त्यानंतर पंजाबमधील जालंदरमध्ये त्यांना तैनाती मिळाली. 6 मे रोजी त्यांची नियुक्ती कुपवाड, पाकिस्तानच्या सिमेजवळ बालाकोट तगधार येथे झाली होती आणि आपल्या नवीन पोस्टवर जात असतांना त्यांचे सैन्य वाहन 8 हजार फुट दरीत कोेसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, 8 महिन्याची लहान मुलगी, दोन भाऊ, आई-वडील असा परिवार आहे.
सैन्याच्या तांत्रिक बाबी पुर्ण झाल्यावर आज सैन्य दलाच्या विशेष विमानाने त्यांचे पार्थिव हैद्राबादला येणार आहे. तेथून लष्करी वाहनात उद्या रात्री उशीरापर्यंत ते तमलूर ता.देगलूर येथे पोहचतील. शहीद सचिन वनंजेवर उद्या 8 मे रोजी शासकीय इतमामात अंतिम संस्कार केले जाणार आहेत. सचिन वनंजेच्या मृत्यूची बातमी नांदेड जिल्ह्यासाठी दु:ख दायकच आहे. अवघ्या 29 व्या वर्षी त्यांच्यावर काळाने झडप घातली आहे.
नांदेड जिल्ह्याचा सुपूत्र काश्मिरमध्ये शहीद झाला; उद्या होणार अंतिमसंस्कार
