मुंबईचे पोलीस कमिशनर म्हणून देवेन भारती यांची नियुक्ती कोणत्या निकषावर?

 

देवेन भारती यांची मुंबई पोलीस आयुक्त पदी नेमणूक झाली याबद्दल त्यांचे अभिनंदन. मुंबईमध्ये आम्ही सहकारी म्हणून काम केलेले आहे. मुंबई 26 /11 हल्ल्याच्या तपासात देवेन भारती यांनी मोठी कामगिरी केली असा उल्लेख वाचण्यात आला? काय कामगिरी केली? 26 /11 हल्ल्याच्या वेळी मी मुंबईला उत्तर विभागाचा अतिरिक्त आयुक्त होतो. करकरे व कामटे यांच्या गाडीवर हल्ला झालाय.ते जखमी आहेत. हल्लेखोर पुढे निघून गेलेत. मदत पाठवा असा मेसेज त्याच गाडीत असलेले पोलीस अधिकारी जाधव यांनी कंट्रोल रूमला वारंवार केला. ते गाडीत जखमी होते पण हल्लेखोरांनी गाडीची तपासणी केली तेव्हा मेल्याचे सोंग केल्याने ते वाचले होते. जाधव यांनी पाठवलेल्या मेसेजची स्टेशन डायरीमध्ये नोंद करताना राकेश मारिया यांनी खाडाखोड केली. जखमींना तात्काळ मदत पाठवली नाही याबद्दल श्रीमती कामटे यांनी आवाज उठविला व आपल्या,’ टू द लास्ट बुलेट’ या पुस्तकात सविस्तर लिहिलंय.

कंट्रोल रूम इन्चार्ज म्हणून मारिया यांनी देवेन भारती यांना मोठा फौज फाटा घेऊन करकरे यांचे मदतीस जाण्याबद्दल आदेश दिला होता. ते ठिकाण कंट्रोल रूम पासून अवघ्या दोन मिनिटे पायी चालण्याच्या अंतरावर होते. हे देवेन भारती तिथे कधी पोहोचले? 40 मिनिटे पेक्षा जास्त वेळ तेथे पोहोचण्यासाठी त्यांना लागला! यावरून त्यांची कार्यक्षमता व प्रभावीपणा दिसून येतो. तरीही त्यांना पोलीस दलात एवढे महत्त्व का?

जेमतेम पाच फूट उंची असलेला शाळकरी मुलगा वाटणारा हा अधिकारी थोडासा अपवाद वगळता कायम मुंबई शहरातच नोकरी करीत राहिला. बाह्य व्यक्तीमत्व हे वजनाने छटाक वाटले तरी राजकीय क्षेत्रात त्याची किंमत अनेक टना मध्ये होती. शरद लेवे मर्डर केस मध्ये मुख्य आरोपी उदयनराजे यांना बेड्या घातलेल्या अवस्थेत 2000 जमावा पुढे उभे करा अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाचे त्यांचे चुलते अभयसिंह राजे यांची मागणी मी मान्य केली नाही. म्हणून साताराचे पालकमंत्री अजित पवार यांचे सूचनेवरून माझी बदली तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांनी अकोला येथे केली होती. अकोला येथून माझी बदली पाच महिन्याच्या आत याच भुजबळांनी केली. त्या ठिकाणी या देवेन भारती यांची नेमणूक केली.

पाच तास भुजबळांच्या केबिन समोर बसून वाट पाहिली. त्यांना प्रत्यक्ष भेटून एकच प्रश्न विचारायचा होता की माझी अकोल्यावरून अशी तडकाफडकी बदली का केली? पुढे पाच महिने रजेवर राहून मी पाठपुरावा केला होता. पण त्यांनी साधी भेट दिली नाही. काही हितचिंतक म्हटले की अरे गुमान पने बदलीच्या ठिकाणी निघून जा. देवेन भारतीने चार्ज घेतलेला आहे. तो भुजबळांच्या वजनाच्या नो….. दुसऱ्या तराजूत टाकून त्यांची तुला करू शकतो! तू कशाला नादी लागतोस?

समतेचा गजर करणाऱ्या तसेच महात्मा फुलेंचा अनुयायी म्हणऊन घेणाऱ्याच्या तोंडाला लाळ आणण्याची क्षमता या अशा अधिकाऱ्यांमध्ये आहे. यावरून त्यांचे महत्त्व कळते.

फुले यांच्या विचाराचा छोटा का होईना पण खरा पाईक मी होतो. देवेन भारती नाही. हे माहिती असले तरी भुजबळ यांना महात्मा फुले यांच्या तत्त्वज्ञानाशी काही देणे घेणे नव्हते. विशेषतः उत्तरेकडून आलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांसाठी मुंबई ही सोन्याची खान असते. देवेन भारती यांनी फेकलेल्या एका तुकड्यावर भाळून भुजबळांनी माझी पाच महिन्याच्या आत बदली केली! हे कारण नसल्यास आजही त्यांनी खरे कारण सांगावे. छगन भुजबळ आणि मी समान कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले, पुणे जिल्ह्यातील, महात्मा फुले यांचे पाईक समजणारे लोक आहोत.

21 व्या शतकातील चाणक्य समजलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सुविद्य पत्नीला एका बुकीने गंडविले असे वर्तमानपत्रात लिहून आले होते. हे प्रकरण पूर्णपणे प्रकाशात न आल्याने नक्की कोणी कोणाला गंडवले हे समजायला मार्ग नाही!पैशाने भरलेल्या बॅगा फडणवीसांच्या सरकारी बंगल्यात पुरविल्याचे व्हिडिओ तयार केले होते असेही ऐकण्यात आले होते. आपल्या पत्नीला या मधून सोडविण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी देवेन भारती यांची मदत घेतली. पूर्वी कधीही नव्हते असे सलग दोन वर्षांचे एक्सटेंशन देऊन देवेंद्रजींनी आपली राखी बहीण रश्मी आक्कांना महाराष्ट्राचे महासंचालक बनविले होते. मुंबई पोलीस दलाच्या इतिहासात कधीही नव्हते असे स्पेशल पोलीस कमिशनर पद निर्माण केले. देवेन भारती यांची त्या ठिकाणी नेमणूक केली. आणि या प्रकरणातून देवेंद्र फडणवीस व त्यांच्या कुटुंबाची त्यांनी सोडवणूकही केली. एवढा हा देवेन भारती नावाचा अधिकारी निष्णात आहे.

इथल्या राजकीय व प्रशासकीय नेतृत्वाकडे पाहिल्यावर सामान्य माणसाला राज्यघटनेचा पराभव झाला असे वाटते! का?

देवेंद्र फडणवीस हे आजच्या महायुती या राजकीय मॉडेलचे प्रातिनिधिक नेते आहेत. त्यांना व्यक्तिगत स्वार्थ आहे. त्याशिवाय त्यांना ब्राह्मणी श्रेष्ठत्व आणि शोषण असलेली सनातन धर्म व्यवस्था बळकट करावयाची आहे. त्यातून अखंड भारताचे स्वप्न साकार करावयाचे आहे.

छगन भुजबळ हे महाविकास आघाडी या राजकीय मॉडेलचे प्रातिनिधिक नेते आहेत. ओबीसी गटाचे नेते म्हणून सिद्ध करून व्यक्तिगत स्वार्थ साधायचा आहे. त्याशिवाय आपले कुटुंब, गणगोत यापलीकडे त्यांचा दृष्टिकोन दिसत नाही.

देवेन भारती हा तरुण प्रशासनामध्ये सनदी अधिकारी बनला हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृपेने. या तिघांनी महामानव बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटने बद्दलची शंका खरी करून दाखवली. त्यावर उपाय काय?

देवेंद्र फडणवीस नेते असलेले महायुती मॉडेल आणि छगन भुजबळ नेते असलेले महाविकास आघाडी मॉडेल, आणि ते राबवण्यासाठी देवेन भारती सारखे सनदी अधिकारी नेते असलेले प्रशासकीय मॉडेल्स ही कालबाह्य झालेली आहेत. इतर अनेक कारणाबरोबर त्यांच्यावर अंकुश ठेवणारी सामान्य माणसांची/सिव्हिल सोसायटी यांची यंत्रणा नाही. आणि म्हणून गरज आहे ती ही दोन्ही मॉडेल्स आणि सनदी नोकरशहा यांच्यावर अंकुश निर्माण करणारे प्रशासकीय मॉडेल निर्माण करण्याची.

मलाच फार कळते असा माझा मुळीच दावा नाही. पण ही मॉडेल्स उघडपणे अपयशी ठरलेली असताना त्याला पर्याय कोणी आणि कधी सुचवायचा हा प्रश्न उपस्थित होतो. मी नाही तर कोण?आणि आता नाही तर कधी? या न्यायानुसार आम्ही ‘अठरापगड मावळे शिवशाही ‘या मथळ्याखाली पर्यायी मॉडेल मांडलेले आहे.देवेन भारतीय सारख्या सनदी अधिकाऱ्याच्या नेमणुकीमुळे आज हा प्रश्न ठळकपणे चर्चेला आला आहे.

–सुरेश खोपडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!