टंचाई व नियोजनसंदर्भात पालकमंत्री अतुल सावे यांची आढावा बैठक 

 जलसंधारण व टंचाई निवारण्याच्या कामाला प्राधान्य देण्याचे आदेश 

नांदेड:- राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास,अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आज आपल्या एक दिवसीय दौऱ्यामध्ये विविध विभागाच्या आढावा बैठकी घेतल्या. जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीची माहिती घेतली. तसेच जिल्हा नियोजनच्या आराखड्यावरही संबंधित यंत्रणेची चर्चा केली.

पालकमंत्री अतुल सावे यांचे शासकीय विश्रामगृह येथे आज सकाळी १० वाजता आगमन झाले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे,अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर,निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी त्यांचे स्वागत केले.

विश्रामगृहात त्यांच्या भेटीला यावेळी खासदार डॉ.अजित गोपछेडे,आ.राजेश पवार हे देखील आले होते.याशिवाय विविध पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

दुपारी पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह नांदेड येथे विविध विभागांच्या बैठकांना सुरुवात झाली. उन्हाळ्याच्या दिवसातील विविध विभागांकडून होणारी टंचाई निवारण व जलसंधारणाच्या कामाला गती देण्याचे निर्देशही त्यांनी आज दिले.तसेच जिल्हा नियोजन समितीचे आराखडे देताना अभ्यासपूर्ण व नाविन्यपूर्ण आराखडे सादर करण्याबाबत तयारीला लागण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

आज सर्वप्रथम पोलीस प्रशासन व महानगरपालिका प्रशासन यांच्या सोबत बैठक घेण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, तसेच महानगरपालिका आयुक्त डॉ.महेश डोईफोडे यांची यावेळी उपस्थिती होती.

शहरातील समस्यांसंदर्भात व विविध प्रलंबित विषयांचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. विशेषत: शहरातील वाहतूक,स्वच्छता,रस्ते,यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून आलेल्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितल्या. शहरांमधील वाहतूक अधिक चांगली करण्याबाबतचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, यांच्यासोबत दुसरी बैठक घेण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील पाणीपुरवठा, पाणीटंचाई, चारा टंचाई, याबाबतचे आगामी काळातील नियोजनाचा आढावा घेण्यात आला. याशिवाय जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच जिल्हा नियोजन समितीमधून नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच अन्य बाबींचे काटेकोर नियोजन करण्याची यावेळी पालकमंत्र्यांनी सूचना केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!