एम.जे.चा खून करणाऱ्या दोन मारेकऱ्यांना सात दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-काल दि.26 फेबु्रवारी रोजी सकाळी 7 वाजेच्यासुमारास गणेशनगर भागात झालेल्या खून प्रकरणी नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने दोन मारेकऱ्यांना 12 तासात पकडले. आज प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी या दोन्ही मारेकऱ्यांना सात दिवस अर्थात 6 मार्च 2025 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
काल सकाळी 7 वाजेच्यासुमारास गणेशनगर भागातील महात्मा फुले हायस्कुलजवळ दुध घेण्यासाठी थांबलेला युवक अमोल चांदु भुजबळे (32) रा.ढोकी ता.जि.नांदेड यावर दोन जणांनी पाठीमागून हल्ला केला आणि त्यात तो मरण पावला. त्या ठिकाणी एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते दोन्ही आरोपी घटना करतांना कैद झाले. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक साईनाथ पुयड, बळीराम दासरे, मिलिंद नरबाग, सखाराम नवघरे, तिरुपती तेलंग, बालाजी यादगिरवाड, सुधाकर देवकते, राजेंद्र सिटीकर आणि दिपक ओढणे या पथकाने तांत्रिक मदतीच्या सहाय्याने अमोल भुजबळेचा खून करणाऱ्या गोपाळ निवृत्ती वाकोडे (25) आणि निखील भगवान वाकोडे (19) या दोघांना परभणी जिल्ह्यातील एका खेडेगावातून ताब्यात घेतले. दरम्यान या प्रकरणी मरण पावलेला युवक अमोल उर्फ एम.जे.चे वडील चांदु मोतीराम भुजबळे यांच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 77/2025 दाखल झाला होता.


मध्यरात्रीनंतर अर्थात 27 फेबु्रवारीच्या रात्री 12 वाजल्यानंतर गोपाळ निवृत्ती वाकोडे आणि निखील भगवान वाकोडे यांना अटक करण्यात आली. पोलीस निरिक्षक शिवाजी गुरमे, पोलीस अंमलदार संदीप राठोड, सरबजितसिंघ पुसरी उर्फ गोपी आणि गृहरक्षक दलाचे जवान मोहम्मद हाजी मोहम्मद युसूफ यांनी या दोघांना न्यायालयात हजर केले. शहरात दहशत पसरली होती. या दोघांनी मारलेले हत्यार, कपडे, जप्त करायचे आहेत. तसेच पोलीस प्राथमिकीमध्ये संशयीत या सदरात लिहिलेल्या नावांच्या संदर्भाने त्यांचा सहभाग शोधण्यासाठी या दोघांची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे पोलीस निरिक्षक शिवाजी गुरमे आणि सरकारी वकील ऍड.सत्यजित जटाळ यांनी सा दरीकरण केले. युक्तीवाद ऐकून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन्ही मारेकऱ्यांना सात दिवस अर्थात 6 मार्च 2025 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
पोलीसांनी आणलेल्या पीसीआर यादीमध्ये एका पानावर सात दिवसांची पीसीआर आणि दुसऱ्या पानावर पाच दिवसांची पीसीआर असे लिहिलेल्या शब्दांना आरोपींचे वकील आक्षेप घेत होते. या संदर्भाची चर्चा न्यायालय परिसरात होती. न्यायालयात आलेल्या काही लोकांपैकी अनेकांनी सांगितले की, आरोपींपैकी निखील भगवान वाकोडेच्या डोक्याला दस्ती बांधलेली होती. जखमी अवस्थेत सुध्दा अमोल भुजबळे उर्फ एम.जे.ने मारेकऱ्यांचाच चाकू हिसकावून निखील वाकोडेला जखमी केले आहे.
संबंधीत बातमी….

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!