नांदेड(प्रतिनिधी)-कोणी पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी लाच स्विकारली, लाच मागणी केली तर त्या अधिकारी, अंमलदारांच्या प्रभारी अधिकाऱ्याला त्याच्या पदावरून हटविण्यात येईल आणि त्या विरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल असे परिपत्रक नांदेडच्या पोलीस अधिक्षकांनी जारी केले आहे. हे परिपत्रक दररोज सकाळ, संध्याकाळी हजेरीमध्ये वाचून दाखवावे आणि त्या बाबतची नोंद पोलीस ठाणे स्टेशन डायरीमध्ये करावी असे या परिपत्रकात नमुद आहे. परिपत्रकाची माहिती पोलीस उपमहानिरिक्षक नांदेड परिक्षेत्र यांना सुध्दा देण्यात आली आहे. पण प्रत्यक्षात लाच घेणे बंद होईल काय? या प्रश्नाचे उत्तर काही सहज नाही.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी दि.20 फेबु्रवारी रोजी जारी केलेले परिपत्रक अत्यंत महत्वपुर्ण आहे. नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर जवळपास 274 पोलीस अधिकारी आणि 3286 पोलीस अंमलदार कार्यरत आहेत. सन 2019 ते 2025 या कालावधीत नांदेड जिल्हा पोलीस दलातील 35 पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्याविरुध्द लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हे दाखल झाले. ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यवाहीमुळे नांदेड जिल्हा पोलीस दलाची जनमाणसातील प्रतिमा मल्लीन झाली आहे. यापुर्वी देखील अशा अनेक कार्यवाह्या झाल्या आहेत.
नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर असलेले पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार यांना या परिपत्रकाद्वारे पोलीस अधिक्षकांनी सक्त सुचना दिली आहे की, कसल्यास प्रकारची लाचेची मागणी करू नये, लाच स्विकारु नका, लाचेच्या प्रलोभनास बळी पडू नका आणि असे घडले तर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यवाहीनंतर त्या अधिकारी, पोलीस अंमलदाराचा प्रभारी अधिकारी त्यांच्या पदावरून हटवला जाईल आणि त्याच्याविरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही होईल.
प्रभारी अधिकाऱ्यांना सुचित केले आहे की, आपल्या अधिनस्त असलेल्या पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदारांना जे अवैध व्यवसायीकांकडून पैसे गोळा करतात तसेच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यवाहीमध्ये अडकू शकतात अशा पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदारांची यादी पाच दिवसात तयार करून नाव व पदनामासह गोपनियरित्या खासदुतामार्फत पोलीस अधिक्षक कार्यालयातील विभागीय चौकशी शाखेत सादर करावीत. सदरचे परिपत्रक पोलीस ठाणे, शाखा येथील दर्शनिय भागात चिटकवून दररोज सकाळी आणि संध्याकाळी हजेरीमध्ये वाचून दाखवावे. तसेच त्या बाबतची नोंद पोलीस ठाण्याच्या डायरीत घ्यावी अशी सुचना या परिपत्रकात आहे.
कागदोपत्री काम करून भ्रष्टाचार बंद होतो काय? हा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. जवळपास सर्वच पोलीस अधिक्षकांनी आप-आपल्या कार्यकाळत असे परिपत्रक जारी केलेले आहे. परंतू लाचेची मागणी, लाचेची स्विकारणी होत असते आणि पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार त्यात अडकच आले आहेत. पाहु या परिपत्रकाचा काय परिणाम भविष्यात होईल.
लाच स्विकारू नका; कोणी स्विकारली तर त्याचा प्रभारी अधिकारी अडकेल शिस्तभंग कार्यवाहीत
