नांदेड(प्रतिनिधी)-सन 2009 मध्ये पोलीसांचा खबऱ्या आहे म्हणून एका 50 वर्षीय व्यक्तीचा खून झाला होता. त्या प्रकरणी पोलीसांनी दोन आरोपींना अटक केले होते आणि 5 फरारच होते. पकडलेल्या दोघांना जन्मठेपेची शिक्षा झाली. पण संचित रजेवर (पॅरोल) आल्यानंतर शिक्षा झालेले पण फरार झाले. त्यातील दोघांना 10 दिवसात स्थानिक गुन्हा शाखेने पकडले आहे. अद्यापही पाच फरारच आहेत. स्थानिक गुन्हा शाखेतील लोकांच्या व्यतिरिक्त इतर विभागांच्या लोकांची मदत घेवूनच स्थानिक गुन्हा शाखेने ही कामगिरी केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सन 2009 मध्ये हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेख बाबा शेख करीम या 55 वर्षीय व्यक्तीचा खून झाला होता. मारेकऱ्यांनी तु पोलीसांचा खबऱ्या आहेस म्हणून त्याचा खून केला होता. या प्रकरणात पोलीसांनी कालिया रघुनाथ शिंगाडे आणि नंदु रामसिंग शिंगाडे या दोघांना अटक केली. या प्रकरणातील इतर पाच आरोपी फरार होते. पुढे न्यायालयात कालिया रघुनाथ शिंगाडे आणि नंदु रामसिंग शिंगाडे या दोघांविरुध्द जन्मठेपेची शिक्षा जाहीर झाली. तुरूंगात राहिल्यानंतर काही दिवसांनी त्यांना पॅरोल मिळाला. पॅरोल मिळाल्यानंतर संचित रजा संपल्यानंतर ते तुरूंगात गेले नाहीत आणि फरार झाले. ते आजही फरार आहेत.
यानंतर पोलीसांनी 14 जानेवारी रोजी या प्रकरणातील एक फरार मारेकरी अविनाश रघुनाथ शिंगाडेला पकडले. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. काल दि.23 जानेवारी रोजी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा सिंहोर मध्यप्रदेश येथून हरी गुलाब चव्हाण उर्फ हरी गुलाबसिंग चौहाण यास पकडून आणले. तो हिमायतनगर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 34/2009 मध्ये खूनानंतर फरारच होता.अशा प्रकारे स्थानिक गुन्हा शाखेने 16 वर्षापासून फरार असलेल्या दोन आरोपींना पकडले आहे.
या प्रकरणी आजही पॅरोलवर आल्यानंतर फरार झालेले कालिया रघुनाथ शिंगाडे, नंदु रामसिंग शिंगाडे, आणि 2009 मध्ये खून केल्यानंतर आजपर्यंत फरार असलेले रघुनाथ रामसिंग शिंगाडे, मयक्या रघुनाथ शिंगाडे आणि पिंक्या रघुनाथ शिंगाडे अशा पाच जणांना पकडायचेच आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक विठ्ठल घोगरे, पोलीस उपनिरिक्षक बळीराम दासरे, लिंबगाव येथील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गुंडेराव करले, दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस अंमलदार देवा चव्हाण, तानाजी येळगे, मोतीराम पवार तसेच खंडणी विरुध्द पथकातील पोलीस अंमलदार राजू बोधगिरे, शेख इसराईल, अनिल बिरादार, साहेबराव कदम, स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत चालक पोलीस अंमलदार अकबर पठाण आणि सायबर सेलमधील राजेंद्र सिटीकर आणि दिपक ओढणे यांनी यशस्वी केली.
स्थानिक गुन्हा शाखेतील एक सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि एक चालक पोलीस अंमलदार असे दोनच व्यक्ती या कामगिरीत आहेत. सायबर विभागातील पोलीस अंमलदार यांची आवश्यकता जिल्ह्यातील सर्वांनाच असते. पण दहशतवाद विरोधी पथकातील देवा चव्हाण, तानाजी येळगे, मोतीराम पवार आणि खंडणी विरोधी पथकातील राजू बोधगिरे, शेख इजराईल, अनिल बिरादार, साहेबराव कदम यांना का घेण्यात आले असा प्रश्न पोलीस विभागातच चर्चेला आला आहे.. विशेष करून दहशतवाद विरोधी पथकातील लोक दररोजच स्थानिक गुन्हा शाखेतच असतात. मग त्यांना तेथे नियुक्ती असण्यापेक्षा त्यांची पुर्नरनियुक्ती स्थानिक गुन्हा शाखेत व्हावी असा नाराजी सुर पोलीस अधिक्षक कार्यालयात ऐकावयास मिळतो.