राष्ट्रीय युवा महोत्सवात विद्यापीठातील संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांना देशात तृतीय पारितोषिक प्राप्त

नांदेड-नुकताच नोएडा, दिल्ली येथे क्रिडा व युवक सेवा संचालनालय भारत सरकार आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सव मोठया थाटात संपन्न झाला. या युवा महोत्सवात देशातील ३६ राज्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याने लोकगीत (समूह) या कलाप्रकारामध्ये देशातून तृतीय पारितोषिक प्राप्त करून बहुमान मिळवला. या कलाप्रकारात नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुलातील संगीत विभागातील विद्यार्थी कलावंताने नांदेड जिल्हास्तर, विभागीय व राज्यस्तरीय युवा महोत्सवात सुवर्णपदक प्राप्त करून राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी निवड झाली.

संगीत विभागाने मागील अनेक वर्षांपासून आपल्या उत्कृष्ट कर्तृत्वाने यशाची उज्वल परंपरा कायम राखत या वर्षी विक्रम घडवला आहे. ही बाब विद्यापीठाच्या सर्व प्राध्यापक व अधिकारी यांच्यासाठी गौरवाची ठरली.

राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी रवाना झालेल्या संघामध्ये समाधान राऊत, तूषार वडणे, प्रशांत चित्ते, ओंकार गायकवाड, गणेश इंगोले, पल्लवी डोईबळे, मिनाक्षी आडे, प्रियंका कोल्हे, मृण्मयी अग्रवाल, श्रीनिवास लंकावाड, गणेश महाजन या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करुन ऐतिहासिक कामगिरी बजावली. या विद्यार्थ्यांना प्रा.डॉ. शिवराज शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले होते.

या दैदिप्यमान यशाबद्दल विद्यार्थ्यांचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, कुलसचिव डॉ. डी.डी. पवार यांनी अभिनंदन केले.

या सर्व विद्यार्थ्यांचा ललित व प्रयोगजीवी कला संकुलामध्ये विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. एम.के. पाटील, आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रा. डॉ. शिवराज शिंदे, प्रा. नामदेव बोंपिलवार, प्रा. अभिजित वाघमारे, प्रा. दिप्ती उबाळे, प्रा. राहूल गायकवाड यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!