नांदेड(प्रतिनिधी)-परभणी येथील युवक सोमनाथ सुर्यवंशी यांना मारहाण झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी परभणी एलसीबीचे निलंबित पोलीस निरिक्षक अशेाक ययातीराव घोरबांड यांच्याविरुध्द मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना कायम सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी करणारे निवेदन लोहा येथील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक रमेश माळी यांनी दिले आहे.
मागील महिन्यात परभणी येथे झालेल्या मारहाण प्रकरणात सोमनाथ सुर्यवंशी या युवकाचा मृत्यू झाला. ती मारहाण पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांनी केली होती असा त्यांच्यावर आरोप आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात घोरबांड यांच्या निलंबनाची घोषणा केली होती. त्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याबद्दलची चौकशी भोकरचे अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे हे करीत आहेत.
या प्रकरणी लोहा येथील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रमेश माळी यांनी नव्याने दिलेल्या निवेदनानुसार अशोक ययातीराव घोरबांड विरुध्द फक्त निलंबनाची कार्यवाही योग्य नाही तर मी मुख्यमंत्र्यांना भेटून त्याबद्दलची सविस्तर माहिती त्यांना देणार आहे. त्यात त्यांच्याकडे असलेल्या बेहिशोबी संपत्तीचे पुरावे माझ्याकडे आहेत. तसेच इतर अनेकही आरोप रमेश माळींच्या बोलण्यात आले आहेत. मात्र फक्त निलंबन नव्हे तर सोमनाथ सुर्यवंशीचा खून केल्याप्र्रकरणी अशोक घोरबांड विरुध्द मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे रमेश माळी यांनी सांगितले.