नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने सन 2025 पासून राष्ट्रपुरूष, थोर व्यक्ती यांची जयंती आणि राष्ट्रीय दिन साजरे करतांना संबंधीत राष्ट्रपुरूष, थोर व्यक्ती यांचे माहिती फलक अल्पपरिचयासह प्रदर्शित करण्यासाठी परिपत्रक जारी केले आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव दिलीप देशपांडे यांची या परिपत्रकावर डिजिटल स्वाक्षरी आहे.
दरवर्षी अनेक महापुरूष, थोर व्यक्ती, राष्ट्रपुरूष आणि राष्ट्रीय दिनांचे कार्यक्रम मंत्रालय, राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरे केले जातात. यामध्ये महाविद्यालय आणि शाळा यांनाही समाविष्ट करण्यात आले आहे. 2025 पासून म्हणजेच आजच्या नंतर येणाऱ्या राष्ट्रपुरूष, थोर व्यक्ती यांच्या जयंती दिनी त्यांच्या छायाचित्रांसह अल्प परिचय देणारी माहिती प्रसारीत करण्यात यावी असे या परिपत्रकात नमुद आहे. 23 इंच रुंद आणि 25 इंच लांब आकाराच्या सनबोर्डवर छापून सनबोर्ड तयार करण्यात यावे. शासनाच्या संकेतस्थळावर जयंती फलक या सदरात त्या-त्या थोर पुरूषाचे अल्प परिचय असलेले फलक उपलब्ध करून देण्यात येतील. या बाबतचा खर्च प्रत्येक शासकीय कार्यालयाने आपल्या कार्यालयाच्या कार्यालयीन खर्चातून भागवायचा आहे. हे परिपत्रक राज्य शासनाने संकेतांक 202501101134049007 प्रमाणे शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केले आहे.