नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाची निवडणुक मराठी पत्रकार परिषद मुंबई यांच्या मार्गदर्शनात होणार आहे. पण भारतीय संविधानाने दिलेल्या मतदारांच्या अधिकाराप्रमाणेच की, सध्या काही काळापुर्वीच आपण पाहिलेल्या लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकाप्रमाणे होणार आहे हे महत्वाचे आहे. 1998 नंतर 2024 पर्यंत चारवेळाच निवडणुका झाल्या आहेत. इतर वेळी नियुक्त जिल्हाध्यक्षच होते.
सध्या नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी आपल्या निवडूण येण्याचा मार्ग उमेदवार शोधत आहेत. त्यात काही मार्ग संविधानाच्या निर्देशाचे असतील, काही मार्ग संविधानाच्या विरोधात जाऊन असतील. पण असे म्हणतात ना प्रेम आणि युध्दात सर्व काही बरोबरच असते. तरीपण इतरांना चांगला मार्ग दाखविण्याची जबाबदारी ज्या पत्रकारांवर आहे. त्यांनी तरी आपण चुकीच्या मार्गाने जाणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. नाही तर गोदी मिडीयाप्र्रमाणे नांदेडमध्ये सुध्दा तसेच घडणार असेल तर त्या पत्रकारीतेला अर्थ उरणार नाही. एखाद्या व्यक्तीवर झालेला अन्याय आपल्या लेखणीला झिजवून मांडण्याची ताकत असणाऱ्या पत्रकारांनी आपल्या सहकारी पत्रकारांवर अन्याय करू नये अशी अपेक्षा आहे. हा सर्व कारभार मराठी पत्रकार परिषद मुंबई यांच्या मार्गदर्शनात होणार आहे. मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी सुध्दा मोठा लढा देवून पत्रकार परिषदेचे अध्यक्ष पद मिळविलेले आहे. म्हणजे त्यांनाही माहित आहे की, कशा प्रकारे अन्याय केला जातो आणि त्यानंतर योग्य उमेदवाराला बाजूला टाकून ऑल इंडियाला वर कसे आणले जाते आणि वर आल्यानंतर ऑल इंडिया काय करतात याची जाणिव एस.एम. देशमुख साहेबांना सुध्दा आहे. म्हणून त्यांच्या नेतृत्वात तरी नांदेड मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीत कोणताही असा मार्ग अवलंबला जाणार नाही ज्यामुळे पुन्हा टिका होतील.
नांदेडमध्ये 1998 ला पहिल्यांदा निवडणुक झाली. त्यावेळी जिल्ह्यातील मतदारांची संख्या 164 होती. त्यात बाबु रुद्रकंठवार हे विजयी झाले होते. त्यानंतर 164 मतांचा हिशोब करतांना अनेकांनी रंगीत पाणी पितपित डोळ्यातून आश्रु काढून रडत होते. त्यावेळी नांदेडचे पोलीस अधिक्षक व्ही.व्ही.लक्ष्मीनारायण हे होते. त्यांनी आयएमएमएम या अतिरेकी संघटनेचा भंडाफोड केला होता आणि पत्रकार परिषद बोलावली होती. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी बाबु रुंद्रकंठवार यांचा केलेला सन्मान कोणीच विसरु शकणार नाही. त्यानंतर मात्र निवडणुका झाल्याच नाहीत आणि सर्व नियुक्त किंवा बिनविरोध उमेदवार नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघावर लादण्यात आले. आजच्या परिस्थितीत नांदेडमध्ये जवळपास 525 मतदारांची नोंदणी आहे. आता पुढे आपल्याला मत मिळणार नाही या भावणेतून जुन्या पत्रकारांना या यादीतून कापले जाईल. काही बाहेरच्या लोकांना यादीत समाविष्ट केले जाईल. या अशा प्रकारांवर मराठी पत्रकार परिषदेने चाणाक्ष नजर ठेवणे आवश्यक आहे. का हवे मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पद याचा विचार केला तर आपल्याच हाताने आपल्याच भावांची उघड करण्याचा तो प्रकार असेल म्हणून तो आम्ही लिहित नाही. तरी पण अपेक्षीत असेच आहे की, मराठी पत्रकार परिषदेने अत्यंत निष्पक्षपणे आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांना अनुरूप मतदारांना संधी देवून नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाची निवडणुक प्रक्रिया पुर्ण करावी अशीच अपेक्षा आहे.