दिवाळी पहाट मधील दोन संस्कृती मिलनांचे प्रतिक दर्शविण्याचा जिल्हा प्रशासनाचा उपक्रम.
नांदेड-नांदेड दिवाळी पहाट 2024 उपक्रमात, पटीयाला शाम चौरसीया घराण्याचे व गुरुमित्त संगीत परंपरे जगभर घेवून जाणारे, ख्यातनाम गायक श्री सतनिंन्दर सिंग बोडल यांची, संपुर्णतः शास्त्रीय संगीतावर आधारीत “ गुरु गोबिंद दा दरबार” हि सांगितीक मैफिल, बंदा घाट, नांदेड येथे गुरुवारी सायंकाळी रंगली. पावसाची सर येऊन गेल्यावरही, रसिकांनी चांगली दाद देत, यामैफिलीचा आस्वाद घेतला. मैफिली ची सुरुवात सरस्वती रागातील बंदिशीने करण्यात आली. त्यानंतर दरबारी रागातील अजब तेरी दुनिया मेरे मालिक या ओळींनी रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकले.
माऊली धरती माऊली आकाश गत गत गवलिया अथम प्रकाश, कबीर को स्वामी सबसमान या गुरुग्रंथ साहेब मधील संत कबीर यांच्या शबद नी उत्कट भक्ती रसाचा प्रत्यय रसिकांना दिला. राजा राम माऊली या अनंत भय या शबद मधून सर्वव्यापी सर्वश्रेष्ठ ईश्वर हा अनादी अनंत आहे या सत्याचा पुनर्प्रत्यय रसिकांना दिला.
सगळ्या जगाचा निर्मिक ईश्वर असून त्या ईश्वराने गुरुकृपेमुळे आम्हाला हा जन्म लाभला आहे ही धरती आणि हे आकाश त्याच्या कृपेच्या परिघात व्यवस्थित आपापले काम करीत आहेत आणि सजीव सृष्टीतील प्रत्येकाच्या तो हृदयात आहे आणि ईश्वरानेच सर्वांचे हृदय प्रकाशित केले आहे असा बहुमोल संदेश या शबद मधून प्रक्षेपित झाला. श्री बोडल हे पंजाबी भाषिक असूनही त्यांनी संत तुकारामाची रचना असलेला अभंग ज्ञानियांचा राजा गुरु महाराव हा अत्यंत ताकदिने पेश करून या भजनाने रसिकांची मने जिंकली. बंदा घाटचे संध्याकाळचे पवित्र वातावरण, मागे वाहत असलेली गोदामाय व बाजूला गुरुद्वारातील पावित्र्य आणि ह्या सर्व सुमंगल वातावरणात भक्तीरसाचा परिपोष असा सुरेख मेळ जमला आणि त्यामुळे निखळशास्त्रीय संगीतामुळे या सुरेख मैफिलीची आस्वाद्यता वाढत गेली. गुरु मानियो ग्रंथ हे व्यक्ती पूजा संपवून विचारांची पूजा करण्याचे आदेश गुरुगोविंद सिंग यांनी नांदेडच्या भूमीत दिले होते ही बाब श्री बापू दासरी यांनी आपल्या निवेदनातून ठळकपणे अधोरेखित केली व या मैफिलीचे सुरेख सूत्रसंचालन केले.
या मैफिलीत तबल्याची साथ श्री सतनिंन्दर सिंग बोडल यांचे थोरले बंधु सुखदेव सिंग बोडल, व हार्मोनियम साथ त्यांचे पट्ट शिष्य मनप्रीत सिंग यांनी दिली. जागतिक स्थरावरील कलाकारां समवेत नांदेड येथील स्थानिक कलाकारांना वाव देण्याचे जिल्हा प्रशासनाचे धोरण यावेळी देखील याठिकाणी दिसून आले. या मैफलीस व्हायोलीन साथ पंकज शिरभाते, आणि बासरी साथ नवोदीत उदयोन्मुख कलाकार अनहद ऐनोद्दिन वारसी यांनी दिली. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनात या शास्त्रीय संगीत मैफिलीचे संकल्पक श्री मकरंद दिवाकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
कौठा नांदेड येथील भागवत कथे मध्ये जसा पावसाने व्यत्यय आणला होता, आणि त्या व्यत्याया मधून वाट काढीत, आपत्ती निवारण केले गेले, अगदी तसाच अनुभव काल रात्री गोदा काठी आला. अवेळी पडलेला पाऊस, आणि धरणातून पाण्याचा विसर्ग, यावर नियंत्रण करीत, जिल्हा प्रशासनाने काही क्षणात, भिजलेला रंगमंच उभा केला, आणि कार्यक्रम सुयोग्य नियोजनात पर पडला. यात नांदेड मनपा, नंदगिरीचे किल्लेदार यांनी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपातस्थिती हाताळली. गट्टाणी साऊंड सिस्टीमच्या तंत्रज्ञ टिमनी अगदी कमी वेळात ध्वणीक्षेपण यंत्रणा व लाईट्स यंत्रणा तत्परतेने सुस्थितीत आणली.
श्री सतनिंन्दर सिंग बोडल यांच्या साथसंगतीत नांदेड येथील व्हायोलीन वादक, श्री पंकज शिरभाते व उदयोन्मुख बासरी वादक अनहद वारसी यांनी कार्यक्रमात बहर आणला. त्यांच्या वादनाने प्रभावीत होत, पंजाब येथील विविध संगीत कार्यक्रमांत या कलाकारानां आमंत्रण मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा मानस श्री सनिंन्दर सिंग बोडल यांनी यावेळी बोलून दाखविला. गुरुग्रंथ साहीब यांच्यावरील एका शास्त्रीय संगीत आधारीत अल्बम च्या उपक्रमासाठी देखील दोन्ही उभयंताचा समावेश केला जाईल असे देखील बोडल यांनी प्रतिपादन केले. दोन राज्यातील विविध संगीत पध्दतीच्या सादरीकरणाचे हे फलीतच म्हणावे लागेल.