नांदेड(प्रतिनिधी)-दि.23 ऑक्टोबर रोजी कंधार ते राणीसावरगाव येथे गेलेल्या बसमध्ये विसलेला एक मोबाईल बस चालक आणि वाहकाने तो मालक शोधून त्याला परत केला. आजपर्यंत सुध्दा या घटनेतील वाहकाने अनेक जणांचे बसमध्ये विसलेले साहित्य त्यांना परत केले आहे.
आज सर्वत्र बेईमानीचे राज्य आहे अशी चर्चा होत असतांना आजच्या युगात सुध्दा इमानदार व्यक्तींची सुध्दा कमतरता नाही अशीच एक घटना काल दि .24 ऑक्टोबर रोजी घडली. दि.23 ऑक्टोबर रोजी कंधार आगाराची बस क्रमांक एम.एच.20 बी.एल.1738 ही एस.टी.गाडी घेवून वाहक संभाजी घुगे आणि चालक रंगनाथ जाधव हे दोघ राणीसावरगावला गेले. या बसमध्ये फेरी मारतांना वाहक संभाजी घुगे यांच्या लक्षात आले की, एका आसनाखाली एक मोबाईल आहे. त्यांनी तो मोबाईल उचलला आणि एस.टी.गाडीतील लोकांना विचारणा केली पण कोणी तो मोबाईल आपला असल्याचे सांगितले नाही. तेंव्हा वाहक संभाजी घुगे यांनी अनेक व्हाटसऍपगु्रपमध्ये असा मोबाईल भेटल्याची माहिती प्रसारीत केली. एका मोबाईल नंबरवरून आलेल्या कॉलनंतर वाहक संभाजी घुगे यांना सापडलेला मोबाईल लेंडेगाव ता.पालम जि.परभणी येथील बाबुराव हाके यांचा असल्याचे समजले. तेंव्हा गाडी वाहक संभाजी बापूराव घुगे आणि त्यांचे सहकारी चालक रंगनाथ जाधव यांनी तो मोबाईल हाके यांना परत केला. जनतेने आणि कंधार आगार प्रमुखांनी एस.टी.तील या वाहक संभाजी घुगे आणि चालक रंगनाथ जाधव यांचे कौतुक केले आहे.