नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील गोकुळनगर भागात असलेले हुतात्मा स्मारक स्थलांतरीत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने परवानगी दिली आहे. हे हुतात्मा स्मारक आता शिवाजीनगर भागातील नाना-नानी पार्कच्या मोकळ्या जागेत स्थलांतरीत होणार आहे.
सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्य येथील अवर सचिव भाग्यश्री भाईडकर यांच्या डिजिटल स्वाक्षरीने निर्गमित झालेल्या शासन निर्णयात नांदेड शहराच्या विष्णुनगर भागात असलेले हुतात्मा स्मारक शिवाजीनगर भागातील औद्योगिक वसाहतीच्या जागेत असलेल्या नाना-नानी पार्क येथील मोकळ्या जागेत स्थलांतरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. खरे तर या अगोदर शासनाने विष्णुनगर येथून हुतात्मा स्मारक बदलून विसावा पार्क येथे नेले आहे. तरीपण नव्याने आता नाना-नानी पार्कमध्ये हे स्मारक स्थलांतरीत करणार म्हणजे पुन्हा खर्च आलाच.
1998 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा हुतात्मा स्मारक समितीची पुर्व मान्यता घेवून जिल्हाधिकाऱ्यांनी हे काम पुर्ण करायचे आहे. महानगरपालिकेला या कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी द्यायची आहे आणि स्थलांतराच्या बांधकामाबद्दल वेळोवेळी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला सादर करायचा आहे.
शेवटच्या दिवशी 349 निर्णय
काल दि. 15 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या आचार संहिता जाहीर झाली. पण राज्य शासनाच्या संकेतस्थळावर पहाणी केली असता राज्य शासनाने विविध विभागांचे 349 निर्णय एकाच दिवशी जाहीर केले आहे. त्यामध्ये लाडकी बहिण योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्याचा निर्णय सुध्दा आहे. म्हणजे आचार संहिता लागली तरी राज्य शासनाच्या या निर्णयातून प्रचार होईलच. म्हणजे पैसे राज्य शासनाचे खर्च होतील आणि प्रचार राजकीय पक्षांचा होईल.