छातीत कळ आली अन्‌…; नांदेडमध्ये लाडकी बहीण कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीने रविवार दि.13 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला आलेल्या एका 53 वर्षीय महिलेचा चकर येवून उपचारादरम्यान मृत्यू झाला.
शांताबाई शिवाजी मोरे (53, रा. भनगी, ता.जि. नांदेड) असे मयत महिलेचे नाव आहे. मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमाला आलेल्या या लाडक्या बहिणीचा मृत्यू झाल्याने कार्यक्रमाला गालबोट लागले.नांदेड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर रविवारी मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत लाडक्या बहिणींचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. जिल्हाभरातून हजारो महिला सकाळी 11 वाजेपासून या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या.
नांदेडपासून जवळच असलेल्या भनगी येथील 50 हून अधिक महिला या कार्यक्रमाला आल्या होत्या. यामध्ये शांताबाई मोरे यांचाही समावेश होता. मुख्यमंत्री दुपारी येणार असल्याने आयोजकांनी महिलांना सकाळी 11 वाजता कार्यक्रमस्थळी बोलावले होते. परंतु प्रत्यक्षात कार्यक्रम उशिराने म्हणजे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सुरू झाला.रविवारी प्रचंड उन्ह तापले होते. प्यायला पुरेसे पाणी देखील मिळाले नाही. महिलांची गर्दी आणि गर्मीमुळे शांताबाई मोरे यांना त्रास होऊ लागला. अचानक त्यांच्या छातीत वेदना सुरू झाल्या आणि त्या चक्कर येऊन खाली पडल्या. यावेळी त्यांना तात्काळ मेळाव्याच्या ठिकाणी असलेल्या आरोग्य पथकाला पाचारण करण्यात आले. शांताबाई यांच्यावर कार्यक्रमस्थळी असलेल्या डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारकामी विष्णुपुरी येथील शासकीय रूग्णालयात पाठविले. मात्र याठिकाणी उपचारा दरम्यानच शांताबाई मोरे यांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!