कौशल्यातून करिअर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी केंद्राचा उपयोग घ्यावा- अभिजीत राऊत

  नांदेडमध्ये 28 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ

नांदेड :- देशातील पारंपारिक कौशल्याला विकसित करण्यासाठी केंद्र शासन विश्वकर्मा योजनेद्वारे प्रयत्न करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्ह्यात 28 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ होत असून त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य आणखी प्रभावी व आधुनिक करण्यासाठी करावा, असे प्रतिपादन नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे केले.

वर्धा येथील राष्ट्रीय कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ आज करण्यात आला. देशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये याचवेळी स्थानिक स्तरावर शुभारंभ करण्यात आला. त्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश होता.

सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, नाविन्यता उपक्रम विभाग व नांदेड येथील एमजीएम इंजीनियरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला एमजीएम इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. देशात कौशल्य विकास संदर्भात अधिक लक्ष घातले जात असून तातडीच्या रोजगाराची उपलब्धता या मार्फत होणार आहे. त्यामुळे रोजगार निर्माण करणारे कौशल्य हस्तगत करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह एमजीएम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या संचालक गीता लाटकर, एमजीएम कॉलेज ऑफ कॉम्पुटर अँड आयटीचे प्राचार्य डॉ. एस. एल. कोटगिरे, प्रशिक्षण अधिकारी प्रसाद तीतरे, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी रेणुका तम्मलवार आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!