महिंद्रा बोलेरो पिकअपसह ५.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

नांदेड (प्रतिनिधी) –  गोवंशाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी नांदेड जिल्हा पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेंतर्गत नायगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कत्तलीसाठी गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याच्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी होटाळा ते नरसीमार्गे मुखेडकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन अडवले. या वाहनातून दाटीवाटीने आणि दोरीने बांधून नेण्यात येणाऱ्या पाच गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली. या कारवाईत वाहनासह एकूण ५ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात गोवंशाच्या अवैध वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत १५ ऑक्टोबर २०२६ रोजी नायगाव पोलीस ठाण्याच्या पथकाला महिंद्रा बोलेरो पिकअपमधून गोवंश जनावरांची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी होटाळा परिसरात नरसी ते मुखेड जाणाऱ्या रस्त्यावर सापळा लावला. यावेळी संशयित महिंद्रा बोलेरो पिकअप (क्रमांक एमएच २६ एडी ८२२७) अडवून पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली. वाहनामध्ये पाच गोवंश जनावरे दाटीवाटीने आणि निर्दयतेने दोरीने बांधून वाहून नेली जात असल्याचे आढळले. पोलिसांनी तातडीने जनावरांची सुटका करून वाहन ताब्यात घेतले.

या कारवाईत अंदाजे चार लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप आणि एक लाख १२ हजार रुपये किमतीची पाच गोवंश जनावरे, असा एकूण पाच लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सय्यद अलीम चाँदसाब (वय ५०) आणि मोहीद्दीन मोहिदोद्दीन अब्दुलसाब कुरेशी (वय ४९), दोघेही रा. बेटमोगरा, ता. मुखेड, यांच्याविरुद्ध नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १३७/२०२६ अन्वये प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश माळी तसेच पोलीस अंमलदार माधव पवार, विनोद भंडारे आणि होमगार्ड यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

अवैध वाहतुकीची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन

गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याचे किंवा जनावरांना निर्दयतेने वागविले जात असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा डायल ११२ वर माहिती द्यावी, असे आवाहन नांदेड पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!