नांदेड (प्रतिनिधी) – आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून तरुणाची तलवारीने वार करून हत्या करणाऱ्या आणि गोदावरी नदीच्या पात्रात मृतदेह फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रकरणातील मुख्य फरार आरोपीला नांदेड ग्रामीण पोलिसांनी मध्यप्रदेशातील भोपाळ येथून जेरबंद केले आहे. पलविंदरसिंग लछमणसिंग चव्हाण (वय २९ वर्ष, रा. भगतसिंग रस्ता, शहीदपुरा, नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीसकोठडी मंजूर केली आहे.

घटना व गुन्ह्याची पार्श्वभूमी

मयत शिवम सुरज गायकवाड व सिमरन नांगरे यांनी प्रेमसंबंधातून पळून जाऊन आंतरजातीय विवाह केला होता. सिमरनच्या नातेवाईकांनी व आरोपींनी या लग्नाला विरोध करत मयताला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ८:०० वाजेच्या सुमारास आरोपींनी धारदार तलवारीने मयताच्या डोक्यावर व मानावर वार करून त्याची निर्घृण हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोदावरी नदीच्या पात्रात फेकून दिला. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८६२/२०२४ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), २३८, ३(५) सह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बनावट नावाने भोपाळ कारागृहात होता बंदी

गुन्हा घडल्यापासून आरोपी पलविंदरसिंग चव्हाण हा सतत फरार होता. तो मध्यप्रदेशातील भोपाळ येथील मध्यवर्ती कारागृहात बंदी असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. नांदेड पोलीस अंमलदारांनी भोपाळ मध्यवर्ती कारागृहात जाऊन खात्री केली असता, आरोपीने बलकार सिंग पि. लक्ष्मण सिंग (वय २५ वर्ष) या बनावट नावाने (शासकीय रेल्वे पोलीस अपराध क्र. ६७४/२०२६) भोपाळ जेलमध्ये आश्रय घेतल्याचे निष्पन्न झाले.

पोलीस कारवाई व अटक

नांदेड पोलिसांच्या पथकाने पीटी वॉरंटद्वारे भोपाळ येथून आरोपी पलविंदरसिंग चव्हाण यास ताब्यात घेऊन नांदेडला आणले. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीस १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही धडक कारवाई नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (इतवारा) प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर. एम. तारू,पोलीस अंमलदार सरबजीत सिंग उर्फ गोपी पुसरी यांच्या पथकाने केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!