कायदे सामान्यांसाठी, अन् आमची गाडी झेब्रा क्रॉसिंगवर!: नांदेडमध्ये वाहतूक शाखेचा भन्नाट कारनामा

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहराच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी दोन स्वतंत्र वाहतूक शाखा स्थापन करण्यात आल्या असून, तेथे दोन पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी कार्यरत आहेत. मोटार वाहन कायद्यानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्वसामान्य वाहनधारकांवर कारवाई करत त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचे काम या शाखांमार्फत केले जाते. मात्र, सर्वसामान्यांना शिस्तीचे धडे देणाऱ्या पोलिसांचे स्वतःचे नियमपालन कसे चालते, याचा एक नमुना ऑक्टोबर महिन्यातील १३ तारखेला सायंकाळी वजीराबाद चौकात पाहायला मिळाला.

वाहतूक नियमांनुसार, जेव्हा रस्त्यावरील सिग्नल बंद असतो, तेव्हा झेब्रा क्रॉसिंग ही पादचाऱ्यांच्या सुरक्षित येण्या-जाण्यासाठी पूर्णपणे मोकळी असणे आवश्यक असते. सर्वसामान्य नागरिकाची गाडी जर अगदी इंचभर जरी या झेब्रा क्रॉसिंगवर सरकली, तर त्याच्यावर तत्काळ दंडात्मक कारवाई केली जाते. महानगरांमध्ये तर कॅमेऱ्यांच्या साहाय्याने असा दंड आपोआपच आकारला जातो. नांदेडमध्ये जरी कॅमेऱ्यांची संख्या कमी असली, तरी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनाकडे पाहूनच नागरिक धडा घेतात, याचे भान प्रशासनाने ठेवणे गरजेचे आहे. परंतु, वजीराबाद चौकात चक्क वाहतूक शाखेचीच गाडी बंद सिग्नल असताना थेट पादचाऱ्यांच्या झेब्रा क्रॉसिंगवर उभी टाकलेली दिसली.

आता या गाडीची पावती कोण फाडणार? रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांच्या हक्काच्या जागेवर जर खुद्द शिस्त राखणारी वाहतूक शाखेचीच गाडी उभी राहणार असेल, तर नागरिकांनी प्रशासनाकडे बोट दाखवणे स्वाभाविकच आहे. या संपूर्ण प्रकारानंतर आता एकच खोचक प्रश्न उपस्थित होत आहे. इतरांवर कारवाईचा बडगा उचलाणाऱ्या या वाहतूक शाखेच्या गाडीला आता नक्की कोण दंड लावणार?

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!