ढोल-ताशांच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप नांदेड (प्रतिनिधी) – गेल्या अनेक दिवसांपासून भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता आज गणरायाला भावपूर्ण निरोप देऊन होत आहे. शहरातील विविध भागांत सकाळपासूनच विसर्जन मिरवणुकीची लगबग सुरू झाली होती. सायंकाळी पाच वाजल्यापासून अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरुवात केली. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, ‘गणपती गेला गावाला, चैन पडेना आम्हाला’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला. गणरायाच्या निरोपासाठी निघालेल्या मिरवणुकांमध्ये ढोल-ताशा पथके, विविध बँड पथके, भजनी मंडळी तसेच पारंपरिक वाद्यांचा सहभाग पाहायला मिळाला. ढोल-ताशांच्या कडकडाटासह तरुणाईचा उत्साह आणि भक्तांच्या जयघोषामुळे शहरातील वातावरणात मोठी ऊर्जा निर्माण झाली होती. अनेक गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना भावनिक वातावरणात सहभाग नोंदविला. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर भाविकांसाठी विविध गणेश मंडळे, सामाजिक संस्था आणि नागरिकांकडून सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ठिकठिकाणी प्रसाद, शरबत आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. काही ठिकाणी भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मोठ्या संख्येने भाविक मिरवणुकीत सहभागी होत असल्याने त्यांच्या सुविधेसाठी स्वयंसेवकांकडून विशेष काळजी घेतली जात होती. काही ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादासाठी विविध पदार्थ तयार करण्यात आले होते. मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांनी या महाप्रसादाचा आनंद घेतला. सेवा भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे गणेशोत्सवातील सामाजिक एकोपा आणि परस्पर सहकार्याची भावना अधोरेखित झाली. नांदेड शहरातील प्रमुख मार्गांवरून गणेश विसर्जनाच्या मिरवणुका मोठ्या उत्साहात पुढे सरकत होत्या. विविध गणेश मंडळांनी आकर्षक सजावट, रोषणाई आणि वाद्यांच्या गजरात आपल्या गणरायाला निरोप देण्याची तयारी केली होती. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिक या सोहळ्यात सहभागी झाले होते. काही ठिकाणी महिला आणि युवतींच्या ढोल-ताशा पथकांनीही लक्ष वेधून घेतले. गणेशोत्सवाच्या या अखेरच्या दिवशी भक्तांच्या चेहऱ्यावर उत्साह असला तरी लाडक्या बाप्पाला निरोप देताना भावनिक वातावरणही निर्माण झाले होते. अनेक भाविकांनी गणरायाच्या चरणी प्रार्थना करून पुढील वर्षी पुन्हा मोठ्या उत्साहात आगमन करण्याचे साकडे घातले. यंदाचा गणेशोत्सव अनेक दिवस भक्ती, श्रद्धा, उत्साह आणि सामाजिक उपक्रमांनी गजबजलेला राहिला. सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणेशोत्सवातही विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आज विसर्जन मिरवणुकीनंतर या उत्सवाची अधिकृत सांगता होणार आहे. दरम्यान, विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरात पोलिसांकडून व्यापक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संवेदनशील ठिकाणी तसेच मिरवणूक मार्गावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. वाहतूक सुरळीत राहावी, मिरवणुका शांततेत पार पडाव्यात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. सायंकाळपासून सुरू झालेल्या विविध गणेश मंडळांच्या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. ढोल-ताशांचा निनाद, बाप्पाच्या जयघोषाने दुमदुमलेले रस्ते आणि भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग अशा वातावरणात नांदेडमध्ये गणरायाला भावपूर्ण निरोप दिला जात आहे. ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!’ या जयघोषाने आज गणेशोत्सवाची सांगता होत असली, तरी भक्तांच्या मनातील बाप्पाविषयीची श्रद्धा आणि भक्ती मात्र वर्षभर कायम राहणार आहे. अनेक गणेश मंडळांनी प्रतीकात्मक निरोप देऊन गणरायाची मूर्ती सुरक्षित ठेवली. नांदेड जिल्ह्यात सुद्धा गणेश विसर्जन अत्यंत उत्साहात आणि शांततेत सुरु आहे. WhatsApp Unknown 2026-09-25 at 18.30.38 Kanthak Suryatal Post Views: 51 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मुख्य निवडणूक आयुक्तांची उल्टी गिनती सुरू! ज्ञानेश कुमारांचे पलायन अन् मोदींचे कार्यक्रम रद्द; लोकशाहीत सर्वात मोठा भूकंप!