नांदेड (प्रतिनिधी) -शहरातील जुना कौठा भागातील श्रीपादनगर येथील कृष्णकुंज अपार्टमेंटमध्ये अज्ञात चोरट्यांनी बंद घरांचे कडी-कोयंडे तोडून १३ तोळे ९ ग्राम सोन्याचे दागिने आणि नगदी रक्कमेसह तब्बल ७ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोबतच शेजाऱ्याच्या घरातून  हजार रुपये रोख रक्कम चोरण्यात आली. दोन चोरीच्या घटनांचा एकाच गुन्हा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

गौरीपूजनासाठी गावी गेले अन् घर फोडले

तक्रारदार नवदीप अप्पाराव जाधव, वय ३२ वर्षे, राहणारे जुना कौठा, नांदेड, मूळ राहणार हासापूर, तालुका भोकर हे १७ सप्टेंबर २०२६ रोजी गौरीपूजनाच्या कार्यक्रमासाठी आपल्या कुटुंबासह मूळ गावी हासापूर येथे गेले होते. २१ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे २:०० ते सकाळी ७:०० वाजेच्या दरम्यान, शेजारी राहणारे दिलीप लिंगोजी जाधव यांनी फोन करून घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोंडा तुटल्याची माहिती दिली. नवदीप जाधव यांनी लागलीच नांदेड येथील घरी येऊन पाहणी केली असता, मुख्य दरवाजाचे लॉक तोडून चोरट्यांनी मास्टर बेडरूममधील कपाटातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लांबवल्याचे उघडकीस आले.

शेजाऱ्याच्या घरातूनही ५० हजारांची रोख रक्कम चोरीला

चोरट्यांनी केवळ नवदीप जाधव यांच्याच नव्हे, तर शेजारी राहणारे सुजय शामराव औरादे यांच्या फ्लॅट नंबर ५०५ चा देखील कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातील ५० हजार रुपयांची नगदी रक्कम चोरून नेली.

चोरी झालेल्या मुद्देमालाचा तपशील

चोरट्यांनी दोन्ही घरातून एकूण ७ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे:

  • सोन्याचे दागिने – एकूण १३ तोळे ९ ग्राम, मूल्य ६ लाख ९५ हजार रुपये:
    • ५ तोळे वजनाचा सोन्याचा पोहेहार – मूल्य २ लाख ५० हजार रुपये
    • ४ तोळे वजनाच्या सोन्याच्या दोन पाटल्या – मूल्य २ लाख रुपये
    • २ तोळे वजनाचे सोन्याचे ब्रासलेट – मूल्य १ लाख रुपये
    • १.५ तोळे वजनाची सोन्याची साखळी – मूल्य ७५ हजार रुपये
    • ५.५ ग्राम वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या – मूल्य ५० हजार रुपये
    • ३ ग्राम वजनाचे सोन्याचे पेंडॉल – मूल्य १५ हजार रुपये
    • १ ग्राम वजनाच्या सोन्याच्या कानातील काड्या – मूल्य ५ हजार रुपये
  • नगदी रोख रक्कम – एकूण ९५ हजार रुपये:
    • नवदीप जाधव यांच्या घरून ४५ हजार रुपये आणि सुजय औरादे यांच्या घरून ५० हजार रुपये रोख रक्कम.

पोलीस कारवाई

या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३३१ उपकलम ४ व कलम ३०५ अंतर्गत प्रथम खबर क्रमांक १२३१/२०२६ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल संजय साळुंके करत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!