नायगाव (प्रतिनिधी) –  संस्थेचे पदाधिकारी किंवा सभासद नसतानाही बनावट लेटरहेड, अध्यक्षपदाचा शिक्का व स्वाक्षरीचा वापर करून शिक्षण संस्थेची दिशाभूल केल्याप्रकरणी नायगाव पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ, होटाळा, ता. नायगाव येथील संस्थेबाबत ३० मार्च २०२६ ते १० मे २०२६ या कालावधीत हा प्रकार घडल्याची तक्रार आहे. आरोपी किशोर रमेश पवार (रा. होटाळा, ता. नायगाव) याने संस्थेचा कोणताही पदाधिकारी अथवा सभासद नसतानाही स्वतःच्या फायद्यासाठी संस्था हडप करण्याच्या उद्देशाने संस्थेचे बनावट लेटरहेड तयार केले. तसेच, स्वतः अध्यक्ष असल्याचे भासवून अध्यक्षपदाचा बनावट शिक्का मारून स्वाक्षरी केल्याचा आरोप आहे. या बनावट कागदपत्रांच्या आधारे संस्थेची नवीन निवडणूक घेणे, जुन्या सभासदांची नावे कमी करून नवीन नावे समाविष्ट करणे आणि संस्थेच्या कार्यकारिणीनुसार निवड करण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकारातून फिर्यादीच्या संस्थेची तसेच शासनाची दिशाभूल करून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष शिवराज भाऊराव पवार (वय ५३, व्यवसाय—संस्था अध्यक्ष, रा. नायगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१०/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ मधील कलम ३१८, ३१९, ३३६ (३)(४), ३४२, ३३८ व ३४१ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक भगत करीत असून, पुढील तपास सुरू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!