गणेशोत्सव हा केवळ उत्सव न राहता समाजसेवेचा आणि सामाजिक परिवर्तनाचा उत्सव व्हावा — डॉ. सान्वी जेठवाणी नांदेड – गणेशोत्सवाच्या पावन पर्वाचे औचित्य साधून सप्तारंग सेवाभावी संस्था, नांदेड यांच्या वतीने नांदेड शहरातील विविध गणेश मंडळांनी सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत सार्वजनिक गणेशोत्सव – २०२६ अंतर्गत अभिनंदन व प्रमाणपत्र वितरणाचा विशेष उपक्रम राबविण्यात आला. सप्तारंग सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सान्वी जेठवाणी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. गणेश मंडळांनी केवळ देखावे आणि मनोरंजनापुरता उत्सव मर्यादित न ठेवता समाजासाठी काहीतरी विधायक कार्य करावे, या विचारातून या उपक्रमाची संकल्पना पुढे आली. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव त्यासोबत सामाजिक एकोपा, संस्कृती, जनजागृती आणि सामाजिक बांधिलकीचा उत्सव व्हावा, या उद्देशाने संस्थेच्या वतीने नांदेड शहरातील गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला. शांततामय, शिस्तबद्ध व अनुकरणीय पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांचे कौतुक करून त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या उपक्रमातून उत्सव देवाचा, मान देशाचा, सन्मान धर्माचा हा सामाजिक संदेश देत गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजात सकारात्मकता, बंधुभाव आणि सामाजिक जबाबदारीची भावना वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमाला गणेश मंडळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामाजिक बांधिलकी जपत करण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमामुळे गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आपल्या कार्याची दखल घेऊन सन्मान करण्यात आल्याने मंडळांच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सप्तारंग सेवाभावी संस्थेचे सदस्य लखन वापरानी, शुभम होवाळ, अक्षय नरवाडे, यश वाठोरे, देवानंद तसेच संस्थेच्या इतर कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. नियोजन, मंडळांशी संपर्क, प्रमाणपत्र वितरण आणि संपूर्ण उपक्रमाच्या अंमलबजावणीत सर्वांनी मोलाचे सहकार्य केले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकजूट आणि सकारात्मक परिवर्तनाची चळवळ अधिक बळकट व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे, अशी भावना सप्तारंग सेवाभावी संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. या उपक्रमामुळे नांदेडातील गणेशोत्सवाला सामाजिक बांधिलकीची सकारात्मक जोड मिळाली असून, आगामी काळातही समाजहिताचे विविध उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे. Kanthak Suryatal Post Views: 63 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation हुतात्म्यांचे शौर्य आणि त्याग नव्या पिढीला दिशा देणारी ऊर्जा – नरेंद्र चव्हाण